रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:38 IST2025-09-15T10:30:50+5:302025-09-15T10:38:29+5:30

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध युरोपमध्ये पसरण्याची भीती आहे. पोलंड आणि रोमानियामध्ये रशियन ड्रोन आल्यानंतर NATO देश याबाबत सक्रीय झाले आहेत. पोलिश सरकारने त्यांच्या भूमीवर नाटो सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलंडनंतर रशियाने रोमानियामध्ये 'ड्रोन घुसखोरी' केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या घडामोडींवर येत्या काळात युद्ध इतर भागात पसरू शकते असं युक्रेनने म्हटले आहे. पोलंडसह रशियाच्या शेजारील देशांच्या सैन्याने सतर्क असल्याचे म्हटले आहे.

द सनच्या वृत्तानुसार युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रोमानियामध्ये रशियाच्या ड्रोन घुसखोरीला युद्धाचा विस्तार म्हटलं आहे. यानंतर पोलंडने नाटो सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या ड्रोन हल्ल्यानंतर पोलंडचे अध्यक्ष कॅरोल नौरोकी यांनी देशाचे रक्षण करण्याचं विधान केले आहे.

NATO चे कलम-४ लागू करण्यात आले आहे. देशाच्या सीमेजवळ रशियन ड्रोनचा सामना करण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने तैनात केली आहेत असा पोलंडने दावा केला आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी रशियन ड्रोन पोलंडमध्ये आल्याची बातमी समोर आली होती.

शनिवारी रोमानियन हवाई क्षेत्रात रशियन ड्रोन उडताना दिसले. त्यानंतर नाटो देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर नाटो देशांमध्ये खळबळ उडाल्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑपरेशन ईस्टर्न सेंट्री पोलिश हद्दीत नाटो सैन्य तैनात करण्यात आले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला करताना त्यांचा एक ड्रोन आमच्या देशात हद्दीत घुसला असं रोमानियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. मात्र ही घुसखोरी नाही, तर रशियाकडून युद्धाचे स्पष्ट संकेत आहेत असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं.

दरम्यान, हंगेरीने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन एफ-१६ विमाने पाठवली. रशियन ड्रोनसमोर एफ-१६ विमानांची तैनाती वाढत्या तणावाचे चित्र दिसून येते. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर नाटो देशांनी रशियाशी थेट टक्कर घेण्याची पहिल्यांदाच तयारी केली आहे.

यापूर्वी नाटो देशांची विमाने फक्त सरावासाठी उड्डाण करताना दिसली होती. मात्र रशियाने पोलंड आणि रोमानियाला गेलेले ड्रोन आमचे नाहीत असं स्पष्टीकरण दिले आहे. हे ड्रोन युक्रेनने तैनात केले होते असा दावा मॉस्कोच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

या युद्धाची व्याप्ती आता युरोपात वाढत चालल्याने ‘नाटो’ सदस्य देश सतर्क झाले असून, फ्रान्स-जर्मनीसह इतर देशांनी संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

ट्रम्प यांनी नाटो देशांनी रशियाकडून इंधन तेलाची खरेदी पूर्णपणे बंद करावी, असे आवाहन केले आहे. या तेल खरेदीत चीन व भारत आघाडीवर असून, यानंतर ‘नाटो’चा सदस्य असलेला तुर्की सर्वांत मोठा खरेदीदार आहे.