शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pakistan PM: माजी पंतप्रधानांसाठी पाकिस्तान 'असुरक्षित', कोणाची भररस्त्यात हत्या तर कोणाला फाशीची शिक्षा; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 7:50 PM

1 / 6
Pakistan PM: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांच्या पायात गोळी झाडली. यामध्ये सुदैवाने इम्रान यांचा जीव वाचला. 15 वर्षांपूर्वी अशाच हल्ल्यात माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचाही मृत्यू झाला होता. तसेच, पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात होती.
2 / 6
इम्रान खान सुदैवाने बचावले- पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा माजी पंतप्रधानांवर हल्ला झाला आहे. गुरुवारी इम्रान खान यांच्यावर वजिराबादमधील रॅलीत हा हल्ला झाला. हल्लेखोराने इम्रान खान यांच्या पायावर गोळी झाडली. सुदैवाने इम्रानचा जीव वाचला. इम्रान यांना मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते फवाद चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानात माजी पंतप्रधानांवर हल्ला होण्याची पहिलीच वेळ नाही.
3 / 6
माजी पंतप्रधानांसाठी पाकिस्तान 'असुरक्षित'- 1) लियाकत अली खान- पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचीही अशाच पद्धतीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लियाकत अली खान रावळपिंडीच्या कंपनी बागेत रॅली करत असताना हल्लेखोराने त्यांच्या छातीत तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर कंपनीबागचे नाव बदलून लियाकत बाग असे ठेवण्यात आले.
4 / 6
2)बेनझीर भुट्टो- माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीही 27 डिसेंबर 2007 हत्या करण्यात आली होती. त्या लियाकत बागेतून रॅलीसाठी निघाल्या, रॅलीनंतर त्यांचा ताफा इस्लामाबादकडे रवाना झाला होता. ताफा लियाकत बागेच्या गेटवर येताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून भुट्टो कारमधून उतरल्या, त्यावेळी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. बेनझीर यांच्याशिवाय आणखी 25 लोक मारले गेले होते. हा हल्ला 15 वर्षीय बिलाल याने केला होता. भुट्टोला गोळ्या घालल्यानंतर बिलालने स्वत:ला बॉम्बने उडवले.
5 / 6
माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली- 10-11 नोव्हेंबर 1974 च्या मध्यरात्री, हल्लेखोरांनी लाहोरमध्ये एका कारवर तीन बाजूंनी गोळीबार केला. अहमद रझा कसुरी ही गाडी चालवत होते. त्यांचे वडील मोहम्मद अहमद खान कसुरी पुढच्या सीटवर बसले होते. अहमद खान कसुरी यांची पत्नी आणि वहिनी मागच्या सीटवर बसल्या होत्या. या हल्ल्यात मोहम्मद अहमद खान कसुरी यांचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. अहमद रझा कसुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या विरोधात वडिलांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
6 / 6
या प्रकरणाचा तपास सुरू होता, तेव्हा लष्कराने झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार पाडले. त्याचवेळी मार्शल लॉ लागू करण्यात आला. जनरल झिया-उल-हक यांनी भुट्टोंना तुरुंगात टाकले. 18 मार्च 1978 रोजी लाहोर उच्च न्यायालयाने झुल्फिकार अली भुट्टो यांना अहमद खान कसुरी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर 4 एप्रिल 1979 रोजी भुट्टो यांना फाशी देण्यात आली. बेनझीर भुट्टो या झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या होत्या.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान