दुसरी नाही! कोरोनाची तिसरी लाट शक्य; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 01:01 PM2020-09-28T13:01:19+5:302020-09-28T13:09:23+5:30

CoronaVirus: ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी महामारीच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सध्या जगात लाट कधी आली आणि कधी संपली हे ओळखण्याचा कोणताही नियम नाहीय़. तरीही ब्रिटेनचे एडिनबर्ग विद्यापीठाचे संक्रमण रोगांवरील प्राध्यापक मार्क वूलहाउस यांनी कोरोनाची तिसरी लाट संभव असल्याचे म्हटले आहे.

मार्क वूलहाउस यांच्या इशाऱ्याचे वृत्त independent.co.uk वर देण्यात आलेले आहे. ब्रिटिश कोरोना एक्सपर्ट मार्क वूलहाऊस यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे कोरोना संपणार नाही. तर संकट थोडे पुढे ढकलले जाईल.

ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांच्या म्हणण्यानुसार भविष्यातील हे संकट रोखण्यासाठी मोठी पाऊले उचलण्यात यावीत. सध्या लागण कमी होण्यासाठी कार्यवाही व्हावी, मात्र, यापासून व्हायरस पळून जात नाही.

बीबीसी वनच्या एका शोमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी गेल्या अंदाजांचाही हवाला दिला आहे. ब्रिटेनमध्ये सप्टेंबरदरम्यान पुन्हा लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली होती.

जेव्हा प्राध्यापक वूलहाऊस यांना विचारण्यात आले की, कोरोनाची तिसरी लाटही येणार का? तेव्हा त्यांनी होकार देत हे. शक्य आहे, असे म्हटले.

जर पुढील सहा किंवा 12 महिन्यांत कोरोनाची लस आली नाही तर आपल्याला अन्य पर्याय शोधावे लागतील. जसे की, मोठ्या संख्येने टेस्टिंगची व्यवस्था करावी लागेल.

ब्रिटिश कोरोना व्हायरस एक्सपर्टने सांगितले की, सध्याच्या काळानुसार विद्यापीठात कोरोनाचे अनेक रुग्ण सापडणे हे आधीच्या अंदाजानुसारच आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचे 4 लाख 34 हजार लोक संक्रमित झाले आहेत. मात्र, 41 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे.

महत्वाचे म्हणजे भारतासह जगाचे लक्ष हे ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनविलेल्या कोरोना लसीकडे लागलेले असताना त्यांच्याच देशातील दुसऱ्या विद्यापीठाच्या तज्ज्ञाने हा इशारा दिला आहे.