चीनमध्ये रहस्यमय आजार पसरतोय; हॉस्पिटल, कब्रस्तानाबाहेर रांगा, शवपेटीचे दर वाढले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:58 IST2025-03-06T11:38:57+5:302025-03-06T11:58:52+5:30

चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून श्वासाशी संबंधित कोविड १९ सारख्या आजारानं कहर केला आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूमुळे आणि रुग्णालयात वाढणाऱ्या रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. देशातील अनेक भागात कब्रस्तानात दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

मृतदेहासाठी ताबूत मिळत नसल्याने त्याच्यासाठीही मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. एपोक टाईम्सच्या हवाल्याने हे वृत्त समोर आलं आहे. बीजिंगच्या एका रूग्णालयात लोकांची गर्दी झाल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चिनी सरकारने आजाराशी निगडित माहिती माध्यमांपासून लपवण्याचा आरोपही करण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, चीनमध्ये कोरोनासारख्या लाटेमुळे आरोग्य आणि अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. हॉस्पिटल आणि स्मशानभूमी त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार काम करत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून अचानक होणाऱ्या मृतांच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे.

उत्तर चीनच्या हेबेई प्रांतात ताबूत मिळत नाहीत. पूर्व चीनच्या अनहुई आणि उत्तर पश्चिमेकडील शानक्सीच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने नव्याने कब्रस्तान उघडण्यात आलेत. अनेक गावात भयाण शांतता दिसून येत आहे. कोविड १९ सारख्या या आजाराने लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे.

तांगशान हेबेई इथं एका गावकऱ्याने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये एका बाजारपेठेसारखी गर्दी झाली आहे. कब्रस्तानात मृतांना दफन करण्यासाठी रांगा लागत आहेत. आमच्या आसपासच्या गावातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांच्या अंत्यसंस्कारासाठी समस्येचा सामना करावा लागत आहे.

वृद्ध, लहान मुलांच्या मृत्यूमुळे लोकांच्या मनात भीती आहे. कोविड १९ मध्ये माझ्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता तेव्हा सरकार ते लपवण्याचा प्रयत्न करत होती असा दावाही गावकऱ्याने केला. त्याशिवाय परिसरात वाढणाऱ्या मृत्यूमुळे शवपेटीही कमी पडत असून त्यांच्या किंमतीही वाढल्याचं त्यांनी म्हटलं.

एका शवपेटीची किंमत ४ हजार युआन होती ती आता अचानक १२ हजार युआनपर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्ते ओस पडलेत, सगळीकडे भयाण शांतता आहे. लोकांनी घराबाहेर पडणेही सोडले आहे असं हेबेईच्या शिजियाझुआंगच्या एका गावक्याने रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

श्वसनाशी निगडीत समस्येमुळे हे सगळे होत आहे. हा कोविडसारखाच आजार आहे. लोकांचा खोकला दिर्घकाळ राहतोय. त्यावर कुठलेही औषध उपयोगी ठरत नाही असं एका गावकऱ्याने सांगितले. वारंवार लोकांना संसर्ग होत आहे, त्यातून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचेही पुढे आले आहे.

अलीकडेच चीनच्या वैज्ञानिकांनी HKU5-Cov2 नावाचा व्हायरस शोधला आहे, कोविड १९ सारखाच हा व्हायरस आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी टीमने या शोध लावला. हा व्हायरस जनावरांपासून माणसांमध्ये पसरला जाण्याची शक्यता असल्याचे चिनी वैज्ञानिकांनी सांगितले होते.

हा व्हायरस कोरोनासारखाच असल्याने जगात नव्या महामारीचं संकट उभं राहण्याची भीती लोकांमध्ये पसरली आहे. भारत हा चीनचा शेजारील देश आहे, दोन्ही देशातील लोक एकमेकांच्या संपर्कात येतात. कोविड १९ प्रकोप भारतातही पाहायला मिळाला होता. त्यामुळे चीनच्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहणं गरजेचे आहे.