भय इथले संपत नाही! चीनमध्ये सापडला नवा व्हायरस; संपूर्ण जगात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 08:07 AM2020-06-30T08:07:03+5:302020-06-30T08:10:05+5:30

संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा ५ लाखांहून अधिक आहे.

संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना आता चिनी वैज्ञानिकांना एक नव्या प्रकारचा फ्लू सापडला आहे. हा फ्लू कोरोना विषाणूप्रमाणेच मोठी महामारी पसरवू शकतो.

चिनी वैज्ञानिकांनी विषाणूला G4 EA H1N1 असं शास्त्रीय नाव दिलं आहे. हा विषाणू डुकरामध्ये सापडला आहे. हा विषाणू डुकरांमधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

डुकरांच्या शरीरात सापडलेला विषाणू माणसापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतर तो लगेच त्याच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना संक्रमित करू शकतो, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

एखाद्या विषाणूच्या प्रसारासाठी, त्याचा संसर्ग होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व लक्षणं डुकरामध्ये सापडलेल्या विषाणूमध्ये असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. त्यामुळे आता जगासमोर नवा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

याआधी २००९ मध्ये जगात फ्लू पसरला होता. त्या फ्लूला स्वाईन फ्लू म्हटलं गेलं होतं. मेक्सिकोमधून हा फ्लू पसरला. मात्र तो तितकासा धोकादायक नव्हता.

स्वाईन फ्लूचा विषाणू फारसा धोकादायक नसल्यानं वृद्ध व्यक्तींनीदेखील त्याचा सामना केला. मात्र चीनच्या वैज्ञानिकांना डुकरांमध्ये सापडलेला विषाणू जास्त घातक आहे.

चीनमध्ये आढळून आलेला विषाणू जवळपास आधीच्या फ्लूसारखाच आहे. मात्र त्यात काही बदल झाले आहेत. या विषाणूमुळे सध्याच्या घडीला तरी धोका नाही. मात्र त्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.

नव्या G4 EA H1N1 विषाणूमध्ये आपल्या पेशी कित्येक पटीनं वाढवण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या फ्लूवर उपलब्ध असलेली लस G4 EA H1N1 विषाणूला रोखण्याच्या कामी येणार नाही.

सध्या जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे आम्ही संभाव्य धोक्यावर नजर ठेवून आहोत, अशी माहिती प्राध्यापक किन चो चांग यांनी दिली.

Read in English