मुस्लिमांविरोधात आग ओकणारे 'बौद्ध भिक्षू' विराथू यांची कारागृहातून सुटका; म्हटले जाते रोहिंग्यांचा कर्दनकाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:06 PM2021-09-07T19:06:50+5:302021-09-07T19:21:04+5:30

969 शी संबंधित लोक मुस्लीम दुकानदारांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात भाष्य करतात. बौद्ध घरे ओळखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर '969' लिहिले जाते. 2003 मध्ये, याच वादामुळे अशिन विराथू यांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि 2010 मध्ये अनेक राजकीय कैद्यांसोबतच त्यांचीही सुटका करण्यात आली होती. (Myanmar military government releases controversial buddha monk ashin wirathu)

रोहिंग्या मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे बौद्ध भिक्षू आशीन विराथू (Ashin Wirathu) हे आता कारागृहातून बाहेर आले आहेत. म्यानमारच्या लष्करी सरकारने त्यांची कारागृहातून मुक्तता केली. आशीन हे मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच वादात राहिले आहेत. म्यानमारमधील लोकशाही सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकले होते. मात्र, म्यानमारमधील सत्तांतरानंतर, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.

1968मध्ये जन्मलेल्या आशीन विराथू यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच शाळा सोडली होती आणि ते भिक्षू झाले. ते 2001 मध्ये राष्ट्रवादी आणि मुस्लिमविरोधी गट '969' सोबत जोडले गेले. म्यानमारमध्ये काही लोक या संघटनेला कट्टरपंथी संघटना मानतात. मात्र, या संघटनेचे समर्थक हा आरोप फेटाळतात.

969 शी संबंधित लोक मुस्लीम दुकानदारांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात भाष्य करतात. बौद्ध घरे ओळखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर '969' लिहिले जाते. 2003 मध्ये, याच वादामुळे अशिन विराथू यांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि 2010 मध्ये अनेक राजकीय कैद्यांसोबतच त्यांचीही सुटका करण्यात आली होती.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर, विराथू सोशल मीडियावर सक्रिय झाले आणि त्याची भाषणे प्रचंड व्हायरल होऊ लागली होती. 2012 मध्ये राखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम आणि बौद्ध समाजात प्रचंड हिंसाचार उसळला होता. यानंतर विराथू हे त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे अधिकच लोकप्रिय झाले. तेव्हापासून अशीन यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळायला सुरुवात झाली.

2013मध्ये टाइम मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर आशीन यांचा फोटो छापला होते. याचे शीर्षक - फेस ऑफ बौद्ध टेरर, असे होते. आशीन विशेषत: रोहिंग्या मुस्लिमांसंदर्भातील वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत.

लष्कर समर्थक विरथू हे आपल्या भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय, काही वर्षांपूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेष प्रतिनिधी यांग ली यांना वेश्या, असेही म्हटले होते. त्यावेळी ते प्रचंड टीकेलाही सामोरे गेले आहेत.

विराथू यांच्यावर लावले गेलेलेल सर्व आरोप हटविण्यात येत आहेत, असे म्यानमारमधील लष्करी सरकारने म्हटले आहे. या निवेदनात असेही म्हणण्यात आले आहे, की विरथू यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या प्रकृतीसंदर्भात सरकारने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

विराथू हे गेल्या काही वर्षांत लष्कर समर्थक रॅलींमध्ये राष्ट्रवादी भाषणे देताना आणि आंग सान सू की तसेच त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी सरकारवर आरोप करताना दिसले होते.

विराथू यांच्यावर 2019 मध्ये म्यानमार सरकारविरोधात द्वेष भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.