धर्मांतराचा परिणाम; जपानमध्ये १० वर्षांत दुपटीने वाढले मुस्लिम!
By मोरेश्वर येरम | Updated: January 13, 2021 17:31 IST2021-01-13T17:15:16+5:302021-01-13T17:31:34+5:30
जपानमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. असं कसं झालं? जाणून घ्या...

गेल्या १० वर्षात मुस्लिमांची संख्या दुपटीने वाढली आहे. २०१० मध्ये जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास १ लाख १० हजार इतकी होती. २०१९ मध्ये यात वाढ होऊन मुस्लिमांची लोकसंख्या आता २ लाख ३० हजार इतकी झाली आहे, अशी माहिती economist.com ने दिली आहे.

महत्वाचीबाब अशी की जपानमध्ये वाढलेल्या मुस्लिमांच्या संख्येत एकूण ५० हजार अशाही जपानी लोकांचा समावेश आहे की ज्यांनी धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. ही माहिती जपानच्या वसेडा युनिर्व्हसिटीचे प्राध्यपक तनाडा हिरोफुमी यांनी जाहीर केली आहे.

जपानच्या लोकसंख्येत घट होत आहे आणि जन्मदर देखील कमी होत आहे. भविष्यात जपानमध्ये काम करणाऱ्या युवकांची संख्या अत्यंत कमी होण्याचा धोका आहे. यामुळे जपानी सरकार परदेशी कामगार आणि कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जपानमध्ये मुस्लिमांची आकडेवारी वाढल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही भर पडली आहे. देशात ११० नव्या मशिदी बांधण्यात आल्या आहेत. २००१ साली जपानमध्ये केवळ २३ मशिदी होत्या.

जपानमध्ये मशिदींची संख्या वाढली असली तरी अजूनही मुस्लिमांना काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. जपानमध्ये कब्रस्तानमध्ये वाढ करण्याची मागणी मुस्लिमांनी लावून धरली आहे.

बीप्पू मुस्लिम असोसिएशनचे प्रमुख अब्बास खान यांनी पुढाकार घेऊन जपानच्या हिजी येथे कब्रस्तान बनविण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला होता.

कब्रस्तानमुळे जमीन अशुद्ध होईल आणि जमिनीखालील पाण्याच्या साठ्यांना याचं नुकसान होईल असं तेथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

जपानमध्येही आता धर्मपरांपरा आणि रितीरीवाजांवरुन दोन गट आहेत. जपानमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा समजून घेऊन आचरण असावं, असं मानणारा एक गट आहे. तर दुसऱ्या गटाचे लोकांना ज्या कुणाला जपानची नागरिकता प्राप्त होते त्यांनी येथील रिती रिवाज मान्य करायलाच हवेत असं वाटतं.

















