जगातील 'या' भागात मोठ्या भूकंपामुळे लाखो लोकांचा जीव जाणार; वैज्ञानिकांचा भीतीदायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:03 IST2025-02-17T09:38:33+5:302025-02-17T10:03:39+5:30

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सोमवारी भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे धक्के जाणवले. पहाटे ५.३७ च्या सुमारास हा भूकंप जाणवला. हे धक्के इतके जोरात होते की, काही इमारती हलल्या, लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. अनेक जण दहशतीच्या सावटाखाली होते.
राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, या भूकंपाची तीव्रता ४.० रिक्टर स्केल इतकी होती. त्याचे केंद्र दिल्लीतील जमिनीपासून ५ किमी खोलीवर होते. कमी खोली आणि केंद्र दिल्लीत असल्याने भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता दिल्ली-एनसीआरमध्ये जास्त जाणवली.
दिल्लीतील भूकंपाच्या धक्क्याची बातमी असतानाच दुसरीकडे वैज्ञानिकांनी जगातील एका भागात महाभूकंपाचा दावा केला आहे. इस्तांबुल येथे लाखो लोक महाभूकंपाने मृत्युमुखी पडतील अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, जगाच्या काही भागात लाखो लोक महाभूकंपाचा बळी ठरतील. ग्रीसच्या किनारपट्टीवर एकामागोमाग एक जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी दहशतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रीसमधील द्विप सेंटोरिनी येथे मागील २ आठवड्यात जवळपास ८ हजार भूकंपाचे धक्के जाणवलेत
ग्रीसमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ सेंटोरिनी इथं आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. त्याशिवाय जगातील अनेक देशात याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियो सायन्सचे वैज्ञानिक मार्को बोहनहोफ यांच्या मते, भूकंपाचा इतिहास पाहिला तर इस्तांबुल इथं २५० वर्षांनी मोठे भंकूप येतात. अखेरचा १७६६ साली मोठा भूकंप आला होता ज्यातून मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला.
पुढील काही दशकात एका मोठ्या भूकंपाची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत आहेत असंही बोहनहोफ यांनी अनेक भूवैज्ञानिक मॉडेल डेटाच्या हवाल्याने म्हटलं. भूकंप विशेतज्ज्ञ नासी गोरूर यांनीही हीच चिंता व्यक्त करत इशारा दिला आहे.
इस्तांबुलमध्ये १ लाख इमारती या बड्या भूकंपामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. लाखो लोक दगावतील इतकी भीषण अवस्था येईल मात्र हा धोका ना सरकारला कळतो, ना स्थानिक लोकांना त्याची जाणीव आहे असं नासी गोरूर यांनी सांगितले.
दरम्यान, यिल्डिज टेक्निकल यूनिवर्सिटीच्या भूविज्ञान विभागाचे प्रोफेसर सुकरू एर्सय यांनीही मोठ्या भूकंपाचा इशारा देत इस्तांबुल यासाठी तयार नसल्याचं म्हटलं आहे. शहराच्या दाट लोकवस्तीमुळे नुकसान कमी करणे कठीण आहे असं त्यांनी म्हटलं.
तुर्कीच्या नगरविकास मंत्री मूरत कुरूम यांनीही याची कबुली दिली आहे. इस्तंबूलच्या पायाभूत सुविधांना शक्तिशाली भूकंप सहन करण्यास संघर्ष करावा लागेल असं मूरत कुरूम यांनी सांगितले आहे.