CoronaVirus News ऑक्सफर्डच्या लसीला मोठा झटका; ब्राझीलमध्ये व्हॉलिंटिअरचा मृत्यू

By हेमंत बावकर | Published: October 22, 2020 10:36 AM2020-10-22T10:36:43+5:302020-10-22T10:43:20+5:30

Oxford AstraZeneca Covid-19 vaccine : ब्राझीलमधील चाचण्यांमध्ये 10000 स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे. यापैकी 8000 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यापैकी बऱ्याच जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

ब्राझीलच्या आरोग्य विभागाने बुधवारी सांगितले की, अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाद्वारे विकसित केलेल्या कोरोना लसीच्या चाचणीवेळी लस टोचलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असे असले तरीही चाचणी सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑक्सफर्डच्या या चाचण्यांना सुरु ठेवण्याच्या योजनेला दुजोरा मिळाला आहे. ऑक्सफर्डने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, सावधानपूर्वक मूल्यांकने केल्यानंतर असे आढळले आहे की क्लिनिकल चाचणीच्या सुरक्षेच्या बाबतीत चिंता करण्याची कोणतीही बाब दिसून आली नाही.

तर अॅस्ट्राझिनेकाने या मृत्यू प्रकरणावर कोमतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

कोरोना व्हायरसविरोधात लस आणण्याच्या स्पर्धेत अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्डची लस सर्वात पुढे आहे. या लसीवरच भारतासह जगभराची आशा आहे.

पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटमध्ये या लसीचे उत्पादनही सुरु झाले आहे.

या मृत्यू प्रकरणी एका सुत्राने रॉयटर्सला सांगितले की, ज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, त्याला जर कोरोना लस दिली गेली असती तर चाचण्य़ा रद्द करण्यात आल्या असत्या. या व्यक्तीला आधी मेनिन्जाइटिसचे औषध दिले गेले होते.

साओ पाऊलोच्या विश्वविद्यालयाच्या मार्गदर्शनानुसार कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिक्षण सुरु आहे. या विद्यापीठाने सांगितले की, एका स्वतंत्र समितीने चाचण्या सुरु ठेवण्यास सांगितले आहे. हा स्वयंसेवक ब्राझीलचाच होता. मात्र, त्याच्याविषयी अधिक माहिती देण्य़ास विद्यापीठाने नकार दिला आहे.

तर सीएनएन ब्राझीलने सांगितले की, हा व्हॉलिंटीअर 28 वर्षांचा होता तो रिओ दी जानेरोचा रहिवासी होता आणि कोरोनाच्या समस्येतून त्याचा मृत्यू झाला.

ब्राझीलमधील चाचण्यांमध्ये 10000 स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे. यापैकी 8000 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यापैकी बऱ्याच जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

दुसरीकडे मृत्यूची बातमी बाहेर येताच अॅस्ट्राझिनेकाचे शेअर 1.8 टक्क्यांनी गडगडले आहेत.

जॉन हापकिन्स विश्वविद्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये कोरोनाचे 52,73,954 रुग्ण सापडले आहेत. तर 154,837 लोकांचा मृत्यू झाला आहे.