तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:25 PM2020-05-27T13:25:28+5:302020-05-27T14:39:52+5:30

कोरोनामुळे मालकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला नेण्यासाठी पाळलेला कुत्रा तीन महिने झाले रुग्णालयात वाट पाहत होता.

कोरोनामुळे एकट्या अमेरिकेतील मृतांचा आकडा लाखावर गेला आहे. जगाचा आकडा साडेतीन लाख झाला आहे. या कोरोनामुळे कोणाचा बाप, तर कोणाची आई, कोणाची मुलगी-मुलगा असे गमावले आहेत. पण आज ही कहानी जरा वेगळी आहे.

कोरोनामुळे मालकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला नेण्यासाठी पाळलेला कुत्रा तीन महिने झाले रुग्णालयात वाट पाहत होता.

चीनच्या वुहानपासून कोरोनाची सुरुवात झाली आहे. त्याच वुहानमध्ये ही घटना घडली आहे.

मेट्रोनुसार हा श्वान माँग्रेल जातीचा आहे. त्याचे नाव शाओ बाओ आहे. तो त्याच्या मालकासोबत फेब्रुवारीमध्ये वुहानच्या हॉस्पिटलमध्ये आला होता. तेव्हा कोरोना तिथे उच्च पातळीवर होता. झू योऊझेन हे ६५ वर्षांचे गृहस्था त्याचे मालक होते.

कोरोनामुळे चीनमध्ये ३८६९ लोकांचा मृत्यू झाला. यात त्यांचेही नाव होते. कोरोना असल्याने त्यांचे शव झाकून मागच्या दरवाजाने बाहेर नेण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

पण बिचाऱ्या शाओ बाओला याची कल्पना कशी असेल. आपला मालक आज ना उद्या बरा होऊन चालत बाहेर येईल आणि आपण त्याच्यासोबत घरी जाऊ, अशा भाबड्या आशेने शाओ बाओ तायकिंक हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये वाट पाहत बसून होता.

एक दिवस गेला, दोन दिवस गेले. हॉस्पिटलच्या स्टाफच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी शाओ बाओच्या दूध, खाण्या-पिण्याची सोय केली. असे तीन महिने उलटले. तरीही शाओ बाओ मालकाची वाट पाहतच राहिला.

१३ एप्रिलला लॉकडाऊन उठले. सुपरमार्केट उघडू लागले. हॉस्पिटलचेही सुपर मार्केट उघडण्य़ात आले. त्याच्या मालकाने वू कुईफेन यांनी शाओबाओची काळजी घेण्यास सुरुवात केली.

जेव्हा त्यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांनी शाओबाओला पाहिले. चौकशी केली असता त्याच्या मालकाचा मृत्यू झाल्याचे समजले. हा कुत्रा आजही त्याच्या मालकाची वाट पाहत असल्याचे कुईफेन यांनी सांगितले.

काही लोकांनी त्याला दूरवर सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाओबाओ पुन्हा त्या हॉस्पिटलमध्येच आला. यानंतर २० मे रोजी रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केली.

यावर श्वानांना घरे देण्याऱी संस्था त्याला घेऊन गेली. कदाचित शाओबाओ आजही त्याच्या मालकाच्या येण्याकडे डोळे लावून बसला असेल.

Read in English