By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:12 IST
1 / 10इस्रायलनं फ्रान्ससोबत सर्व संरक्षण संबंध रोखण्याची घोषणा केली आहे. इराण युद्धातच फ्रान्स आमच्याविरोधात शत्रुत्वपूर्ण भूमिका घेत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. फ्रान्स एकेकाळी इस्रायलचा एक मजबूत संरक्षण भागीदार होता आणि त्याने इस्रायलला लढाऊ विमानांचा पुरवठाही केला होता. मात्र आता या दोघांमधील संबंध बिघडले आहेत. 2 / 10२०२० ते २०२४ पर्यंतच्या सिप्री (SIPRI) आकडेवारीनुसार, फ्रान्स हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश असून जागतिक शस्त्र निर्यातीत त्याचा वाटा ९.६% आहे. त्यामुळे इस्रायलसोबतचे संरक्षण संबंध तोडण्याचे दूरगामी परिणाम होतील. इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांनी एका इस्रायली टीव्ही चॅनलवर ही घोषणा केली. इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक, मेजर जनरल (निवृत्त) अमीर बाराम यांनी फ्रान्सकडून होणारी सर्व संरक्षण खरेदी शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे 3 / 10आता ऐवजी देशांतर्गत इस्रायली खरेदी किंवा मित्र राष्ट्रांकडून होणारी खरेदी केली जाईल. फ्रान्सने अशा अनेक कृती केल्या आहेत ज्यामुळे इस्रायलच्या सुरक्षेला आणि त्याच्या संरक्षण उद्योगाच्या कार्यात्मक क्षमतेला हानी पोहोचली आहे असं इस्रायल संरक्षण प्रवक्त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.जेव्हा आम्ही इराणसोबत युद्ध करत होतो तेव्हा फ्रान्सने आमच्यासोबतचे सुरक्षा सहकार्य कमी केले. अलीकडच्या काळात फ्रान्सने इस्रायलविरोधात अनेक पावले उचलली आहेत असा इस्रायलचा आरोप आहे.4 / 10फ्रान्सने इस्रायलवर शस्त्रबंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये फ्रान्सने इस्रायलला आव्हान देत पॅलेस्टाईन राज्याला मान्यता दिली. पॅरिसमधील संरक्षण प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यास इस्रायली कंपन्यांवर बंदी घालण्यात आली. ३१ मार्च रोजी फ्रान्सने इराणविरुद्धच्या युद्धात वापरलेली अमेरिकन शस्त्रे वाहून नेण्यासाठी इस्रायलला आपली हवाई हद्द वापरू न देण्याचा निर्णय घेतला.5 / 10अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही फ्रान्सच्या निर्णयावर टीका केली. फ्रान्सने सैन्य उपकरणे घेऊन इस्रायलकडे जाणाऱ्या विमानांना आपल्या भूभागावरून उड्डाण करण्याची परवानगी नाकारली. इराण युद्धात फ्रान्सची अजिबात मदत झाली नाही. अमेरिका हे लक्षात ठेवेल अशी नाराजी ट्रम्प यांनी बोलून दाखवली. फ्रान्स आणि इस्रायल हे जागतिक शस्त्र निर्यात बाजारपेठेतील स्पर्धक आहेत. फ्रान्स हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश आहे तर इस्रायल जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. प्रमुख शस्त्र आयातदार देशांमध्ये बाजारपेठेतील वाटा मिळवण्यासाठी हे दोन देश अनेकदा स्पर्धा करतात. मात्र एकेकाळी या दोन देशांचे संबंध खूप घनिष्ठ होते.6 / 10१९४८ मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर जवळजवळ दोन दशके फ्रान्स हा इस्रायलचा सर्वात बलवान आणि सर्वात विश्वासार्ह संरक्षण भागीदार होता. तो एकमेव पाश्चात्य शक्तीशाली देश होता, ज्याने अमेरिकेने इस्रायलवर निर्बंध लादलेले असूनही प्रगत विमाने, रणगाडे आणि कथितरित्या अणुतंत्रज्ञान विकसित करण्यात मदत केली होती. १९४९ मध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर अवघ्या एका वर्षानंतर अमेरिकेने १९५० च्या त्रिपक्षीय घोषणेअंतर्गत इस्रायलवर शस्त्र निर्यातीवर बंदी घातली. ही त्रिपक्षीय घोषणा अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जारी केलेले एक संयुक्त निवेदन होते ज्यात १९४९ च्या अरब-इस्रायल युद्धविरामादरम्यान निश्चित केलेल्या सीमांची हमी देण्यात आली होती.7 / 10मात्र १९५३ पर्यंत फ्रान्सने गुप्तपणे इस्रायलला शस्त्रपुरवठा पुन्हा सुरू केला. १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. फ्रान्सने इस्रायलला त्याचे पहिले जेट फायटर, डसॉल्ट ओरागन, विकले आणि नंतर इस्रायलला प्रगत मिस्टेर मालिकेतील लढाऊ विमानांचा पुरवठा केला. १९५६ च्या सुएझ कालवा संकटावेळी इस्रायल, ब्रिटन आणि फ्रान्स एकाच बाजूने लढले तर अमेरिकेने इजिप्तवरील लष्करी हल्ल्याला विरोध केला.8 / 10१९५९ मध्ये फ्रान्सने इस्रायलला आपले सर्वात नवीन अत्याधुनिक डसॉल्ट मिराज III विकले. हे एक सुपरसॉनिक डेल्टा-विंग इंटरसेप्टर लढाऊ विमान होते, जे इस्रायली हवाई दलाचा कणा बनले. इस्रायलकडे ७० हून अधिक मिराज लढाऊ विमाने होती ज्यांचा वापर त्यांनी १९६७ च्या अरब देशांविरुद्धच्या युद्धात अत्यंत प्रभावीपणे केला. फ्रान्सने इस्रायलला AMX-13 हलके रणगाडे, तोफखाना, रडार प्रणाली आणि नौदल जहाजेसुद्धा पुरवली.9 / 10१९६७ च्या ६ दिवसीय युद्धात जेव्हा इस्रायलला फ्रान्सची सर्वाधिक गरज होती, तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अचानक आपले धोरण बदलले आणि इस्रायलवर संपूर्ण शस्त्रबंदी लादली. फ्रान्सने ५० मिराज-५ विमाने देण्यासही नकार दिला, ज्यासाठी इस्रायलने आधीच पैसे दिले होते. ही विमाने इस्रायलच्या विशिष्ट गरजांनुसार बनवली गेली होती आणि फ्रान्सने त्यासाठी ७५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम मोजली होती तरीही फ्रान्सने ही विमाने देण्यास नकार दिला.10 / 10१९७२ मध्ये फ्रान्सने इस्रायलला व्याजासह पैसे परत केले. तरीही फ्रान्सने इस्रायली हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांना मोठे नुकसान पोहोचवले. त्यानंतर इस्रायलने स्वतःची शस्त्रे विकसित करण्यास सुरुवात केली आणि आज ते प्रगत शस्त्रांच्या उत्पादनात फ्रान्सच्या बरोबरीने उभे आहे. त्यानंतर फ्रान्सने अमेरिकन लढाऊ विमाने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि आज ते एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमान चालवते.