ज्याच्या हत्येसाठी अटक झाली तो जिवंत निघाला; युगांडात अटक झालेल्या भारतीय वंशाच्या तरुणीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:19 IST2025-02-24T19:08:11+5:302025-02-24T19:19:07+5:30

भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यापारी पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा ओसवाल हिला युगांडात गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती वसुंधराने दिली आहे.

भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यापारी पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा ओसवाल सध्या चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला युगांडामध्ये अटक करण्यात आली होती आणि तुरुंगात पाठवण्यात आले होते. १ ऑक्टोबर रोजी, सुमारे २० सशस्त्र लोकांनी वसुंधरा ओसवालला एक्स्ट्रा-न्यूट्रल अल्कोहोल प्लांटमधून ताब्यात घेतले होतं.

वसुंधरा ओसवालने आरोप केला की, तिला सुमारे तीन आठवडे युगांडाच्या तुरुंगात राहावे लागले जेथे तिच्या तिच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाले. २६ वर्षीय वसुंधरा ओसवालवर हत्येचा आरोप होता. गेल्या वर्षी ओसवाल यांचे माजी कर्मचारी मुकेश मेनारिया यांचे अपहरण आणि हत्या केल्याचा खोटा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.

याच प्रकरणात वसुंधरा ओसवालला पोलिसांनी पाच दिवसांसाठी ताब्यात घेतले होते पण आणखी दोन आठवडे तुरुंगात ठेवले होते. युगांडाच्या पोलिसांनी तुरुंगात असताना अंघोळही करू दिली नाही. तसेच अन्न-पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप वसुंधरा ओसवालने केला.

माझ्या आई वडिलांना मला जेवण, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी वकिलांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असंही वसुंधराने सांगितले.

एवढचं नाही तर तुरुंगात असताना तिला बाथरूममध्येही जाऊ दिले जात नव्हते. वसुंधराला १ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली आणि २१ ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला.

पोलिसांनी तिला वॉरंटशिवाय अटक केली होती. तिने पोलिसांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी हा युगांडा आहे जिथे ते काहीही करू शकतात, असं म्हटलं. एका पुरुष अधिकाऱ्याने मला उचलून पोलीस व्हॅनमध्ये फेकले, असंही वसंधुराने सांगितले.

वसुंधराने आरोप केला की, तिला ३० हजार अमेरिकन डॉलर भरण्यास आणि पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले होते. न्यायालयाने तिची बिनशर्त सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतरही तिला ७२ तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले होते.

महत्त्वाची बाब म्हणजे ज्याच्या मृत्यूप्रकरणी तिला अटक करण्यात आली ती व्यक्ती जिवंत आहे आणि हे माहीत असतानाही पोलिसांनी तिला या आरोपाखाली तुरुंगात डांबून ठेवले होते.

वसुंधरा ओसवालचा जन्म १९९९ साली महाराष्ट्रातच झाला. पंकज ओसवाल आपल्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांनी कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसुंधराने स्वित्झर्लंड विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती कौटुंबिक व्यवसायाचाही एक भाग बनली.

वसुंधरा ओसवाल यांचे वडील पंकज ओसवाल हे एक यशस्वी उद्योगपती असून लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्येही त्यांचे मोठे नाव आहे. पंकज ओसवाल यांचे घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे, ज्याची किंमत १,६५० कोटी रुपये आहे.

पंकज ओसवाल हे ऑस्ट्रेलियन स्विस व्यापारी असून ते प्रसिद्ध उद्योगपती अभय कुमार ओसवाल यांचे पुत्र आहेत. ते प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, खते, खाणकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यापारी आहेत.