भारतात पुढील ३ महिन्यांत कोरोनाचा हाहाकार, १० लाख लोकांचा होणार मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

Published: May 9, 2021 04:54 PM2021-05-09T16:54:19+5:302021-05-09T16:58:43+5:30

कोरोना विरोधाच्या लढ्यात भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण अजूनही विषाणूचा प्रकोप काही थांबताना दिसत नाहीय. त्यात लॅन्सेट या विज्ञान विषयक आरोग्य नियतकालिकेनं धक्कादायक माहिती दिली आहे. जाणून घेऊयात... (india may witness one million coronavirus death till august lancet report)

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मृत्यूंचाही आकडा वाढतोय. यातच ब्रिटनहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येत्या १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि यासाठी भारत सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा सुप्रसिद्ध 'लॅन्सेट' या नियतकालिकेतून देण्यात आला आहे.

'लॅन्सेट'च्या संपादकीय लेखात धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. भारताने सुरुवातीच्या काळात कोरोनावर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र, त्यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत केंद्र सरकारने नेमलेल्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठकच झाली नाही. त्यामुळे आता देशात १० लाख मृत्यू झाल्यास त्या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकार जबाबदार असेल, असं संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

लॅन्सेटनं जाहीर केलेल्या अहवालानुसार पुढील तीन महिन्यांमध्ये साडेसात लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यूचा धोका वर्तविण्यात आला आहे. भारतानं कोरोना नियंत्रणामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींचा उच्चांक आहे.

धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका असल्याचं माहित असतानाही भारतात धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली. यातील कुंभमेळ्यात देशभरातून लाखो लोक एकत्र आले आणि यात कोरोना संबंधीच्या नियमांना धाब्यावर बसविण्यात आलं होतं. याचे परिणाम भारताना भोगावे लागणार आहेत, असं लॅन्सेटच्या लेखात नमूद करण्यात आलं आहे.

देशातील लसीकरण धीम्या गतीनं होणं देखील धोका वाढवत असल्याचं लेखात नमूद करण्यात आलं आहे. कोरोना संकट काळात सरकारवर होणारी टीका रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना कोणतीही बगल दिली जाऊ शकत नाही. दुसऱ्या लाटेसंदर्भात आधीच इशारा देण्यात आला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हीच वास्तविकता आहे, असा हल्लाबोल लेखातून करण्यात आला आहे.

भारतातील कोरोनाचा विस्फोट रोखण्यासाठी लेन्सेटच्या लेखात काही उपाय देखील सुचविण्यात आले आहेत. यात देशातील लसीकरण मोहिमेत मोठे बदल करण्याी गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. लसीकरणाच्या निर्मितीत वाढ करुन वितरण व्यवस्थेसाठी कँप स्वरुपात योजना आखण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

याशिवाय लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण झाली असेल तर याबाबत विचार करण्यात वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही. लोकांसमोर खरे आकडे सादर करुन सद्यस्थितीची जाणीव करुन देत जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील, असाही सल्ला देण्यात आला आहे.

भारतातील कोरोनाची परिस्थिती येत्या काळातही अशीच राहिली तर सप्टेंबरपर्यंत देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १४ लाखांच्याही वर पोहोचेली असेल, असा दावा Institute for Health Metrics and Evaluation, Washington नं केला आहे.

आतापर्यंत देशात १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ४२ हजार ३६२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ३७ लाख ३६ हजार ६४८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English