पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार! 'हे' ३ दिवसांचं प्लॅनिंग भारतासाठी फायद्याचं ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:29 IST2025-03-03T15:20:23+5:302025-03-03T15:29:02+5:30

पाकिस्तानात सध्या बिकट परिस्थिती आहे. त्यातच बलूच बंडखोरांनी बलूचिस्तानमध्ये खैबर परिसरात नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर येणाऱ्या काळात नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. त्याचं नाव आहे बलूच नॅशनल आर्मी...
बलूचिस्तान आणि सिंध प्रांतात सक्रीय बंडखोरांच्या छोट्या छोट्या संघटना आता एकत्र आल्या आहेत. गुप्तचर माहितीनुसार, बलूच लिबरेशन आर्मी, बलूच लिबरेशन फ्रंट, बलूच रिपब्लिकन गार्ड्स, सिंधू देश क्रांतिकारी सेना यांनी संयुक्तपणे पाकिस्तान आणि चीनविरोधात नवीन ऑपरेशन सुरू करण्याची तयारी केली आहे.
या सर्व संघटनांची मागील ३ दिवसांपासून बैठक सुरू होती. या बैठकीत नवी रणनीती आखण्यात आली, त्यातून बलूच नॅशनल आर्मी असं नव्या फ्रंटला नाव देण्यात आलं. बलूच राजी अजोही संगार(BARS) याचाच इंग्रजीत अर्थ बलूच नॅशनल फ्रिडम मूवमेंट.जी बलूचमधील बंडखोर संघटनांनी एकत्रित मिळून बनवली आहे.
पाकिस्तानात बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई एकत्र लढली जाणार आहे. पाकसोबत चीनदेखील बलूचिस्तानमध्ये सक्रीय आहे. त्यामुळे बलूच राजी अजोही संगार यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. या बैठकीबाबत जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात संघटनांनी भविष्य काळातील प्लॅनबाबत माहिती दिली.
या बैठकीचा हेतू बलूचमधील सर्व बंडखोरांना एकाच छत्राखाली आणणं. बलूचमधील राष्ट्रीय आंदोलन आणखी तीव्र करणे, पाकिस्तान आणि चीनविरोधात घातक ऑपरेशन करणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध लढणे या सर्व गोष्टींवर या ३ दिवसीय बैठकीत गहन चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
बलूचिस्तानमधील सर्व महत्त्वाचे रस्ते रोखून पाकिस्तानी सैन्याच्या लॉजिस्टिक आणि अर्थव्यवस्थेला धक्का दिला जाणार आहे. बलूच नागरीक आणि त्यांच्या संपत्तीविरोधात पाक आणि चीनचा खरा चेहरा जागतिक पातळीवरील व्यासपीठावर आणण्याचा मानसही बंडखोर संघटनांनी केला आहे.
या बैठकीत BARS लवकरच बलूच नॅशनल आर्मी लॉन्च करणार असून विविध संघटनेचे कार्यकर्ते, लीडर मिळून एक इंटीग्रेटेड मिलिट्री स्ट्रक्चर बनवण्यात येईल. हायलेव्हल कमिटी, डिपार्टमेंट असतील. सर्वच स्तरावर संघटनेला मजबूत करण्यासाठी पुनर्गठन करण्यात येईल. जेणेकरून लवकरात लवकर नव्या रणनीतीने पाक आणि चीनविरोधात चळवळ उभी करता येईल.
बऱ्याच दशकापासून पाकिस्तान त्यांच्या समस्येसाठी चीनचा वापर करत आहे. भारताविरोधात चीन पाकिस्तानला साथ देईल असं त्यांना वाटते. त्यात बलूचिस्तानमध्येही चीनचा वापर करून तिथल्या लोकांचं शोषण करत असल्याचा आरोप पाकिस्तानवर आहे. नुकतेच बलूचिस्तानात भारताचा राष्ट्रीय तिरंगा झेंडा फडकवण्यात आला होता. इथले लोक भारतात सहभागी होण्यासाठी आंदोलनात उतरल्याचं याआधी दिसून आले होते.
३ दिवसीय बंडखोरांच्या बैठकीत पाकिस्तानी सैन्यासोबत लढण्यासाठी योजना बनवली जात आहे. बलूचमधील संघटनांचा हा निर्णय पाकिस्तानसाठी सर्वात मोठं संकट बनू शकतो. बलूचिस्तानच्या अनेक भागात याआधीच बंडखोरांनी पाक सैन्याविरोधात मोहिम हाती घेतली आहे.
या नव्या रणनीतीमुळे पाक सरकारसमोर बलूचिस्तान वेगळे होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बलूचिस्तानचं क्षेत्रफळ तुलनेत पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. परंतु याठिकाणी देशातील २ टक्केच लोकसंख्या राहते. दीर्घ काळापासून बलूचिस्तानमध्ये बंडखोराची चळवळ सुरू आहे.