डिजिटल लाइफ आता लपवता येणार नाही; एच-१बी अर्जदारांची १५ डिसेंबरपासून कसून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:30 IST
1 / 7ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमानुसार, एच-१बी आणि एच-४ व्हिसावर अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांचे जर सोशल मीडिया खाते असेल, तर ते आता सार्वजनिक करावे लागणार आहे. या नियमामुळे, ज्या अर्जदारांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवली होती, त्यांना ती आता सर्वांसाठी खुली करावी लागतील.2 / 7केवळ एच-१बी आणि एच-४ व्हिसा अर्जदारांसाठीच नव्हे, तर विद्यार्थी व्हिसा, नॉन-अकॅडमिक व्होकेशनल व्हिसा आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा अर्जदारांनाही या नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.3 / 7अमेरिकेच्या या निर्णयामुळे व्हिसा अर्जदारांच्या गोपनीयतेवर मोठा परिणाम होणार असून, त्यांच्या डिजिटल आयुष्याचा मागोवा घेण्याचा मार्ग अमेरिकेच्या प्रशासनासाठी खुला होणार आहे.4 / 7या नव्या सोशल मीडिया नियमांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने एच-१बी आणि एच-४ व्हिसा अर्जदारांच्या सखोल चौकशी आणि तपासणीचे नवे आदेश लागू केले होते. येत्या १५ डिसेंबरपासून एच-१बी अर्जदार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची पुन्हा एकदा सखोल तपासणी आणि चौकशी केली जाणार आहे.5 / 7याआधी विद्यार्थी आणि अमेरिकेत भेट देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू झाली होती. आता ही चौकशी नोकरीसाठी येणाऱ्या स्थलांतरितांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही एच-१बी व्हिसाबाबत मोठे निर्णय जाहीर करून स्थलांतरितांना धक्का दिला होता.6 / 7या कठोर नियमावलीमागे ट्रम्प प्रशासनाची भूमिका स्पष्ट आहे. 'अमेरिकेचा व्हिसा हा अर्जदाराचा अधिकार नसून, अमेरिकेत रोजगार करण्याची ती एक संधी आहे.' स्थलांतरितांची पार्श्वभूमी, त्यांचे सोशल मीडियावरील विचार आणि सामाजिक वर्तन यांची कसून तपासणी करणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे. 7 / 7या निर्णयामुळे अमेरिका आता एच-१बी आणि एच-४ व्हिसा अर्जदारांवर अधिक कठोर पाळत ठेवणार आहे, ज्यामुळे खासकरून भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.