५ तासात १३२ खोल्यांमध्ये बदल, इतक्या कमी वेळात कसं तयार होणार 'White House'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:30 IST2025-01-15T16:26:48+5:302025-01-15T16:30:00+5:30

२० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेण्यासाठी व्हाईट हाऊसला पोहचणार आहे. त्याच्या काही तास आधीच सध्याचे राष्ट्रपती बायडन घर खाली करतील. या दोन्ही नेत्यांच्या येण्या आणि जाण्यात केवळ ५ तास मिळतील. त्यात ५०० हून अधिक कर्मचारी एकत्र काम करून नव्या राष्ट्रपतींच्या पसंतीनुसार व्हाईट हाऊसमध्ये बदल करतील. सर्वात जास्त सुरक्षा ठेवली जाईल
१३२ खोल्या आणि ४१२ दरवाजे असणारे व्हाईट हाऊस जगातील सर्वात सुरक्षित घर आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे ते अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखले जाते. परंतु जुने राष्ट्रपती जाण्यापासून ते नवीन राष्ट्रपती येण्यापर्यंत खूप कमी कालावधी कर्मचाऱ्यांना मिळतो त्यात १३२ खोल्यांमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या पसंतीनुसार बदल केले जातात.
सामान्यत: शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रपती एका खोलीत येतात आणि तिथूनच शपथ समारंभास पोहचतात. बराक ओबामा आणि ज्यो बायडन यांनीही हेच केले होते. परंतु ट्रम्प यांची स्टाईल हटके आहे. २०१७ साली शपथ घेतल्यानंतर ते व्हाईट हाऊसला पोहचले होते. यावेळी त्यांनी कुठलीही सूचना दिली नाही. यंदा ट्रम्प यांच्यासह मेलानिया २० जानेवारीला व्हाईट हाऊसला येतील असं बोललं जाते.
व्हाईट हाऊसमधील बदलांबाबत फर्स्ट लेडी यांच्यासोबत बैठक होते. त्यात त्यांची पसंत नापसंत समजून घेतली जाते. जर फार काही बदल आवश्यक नसेल तर तेदेखील सांगावे लागते. शपथ समारंभाची सुरूवात देशाचे मुख्य न्यायाधीश कॅपिटल हिल इथं पोहचतात आणि नव्या राष्ट्रपतींना शपथ दिली जाते.
शपथविधीनंतर ते भाषण देतात ज्यात त्यांच्या आगामी कामांचा ड्राफ्ट असतो. कॅपिटल हिलमधून निघून ते औपचारिक लंचसाठी जातात तिथे सुप्रीम कोर्टाच्या जजसह सर्व बडे अधिकारी उपस्थित असतात. त्यानंतर कॅपिटल हिल ते व्हाईट हाऊस परेड केली जाते जेणेकरून जनतेला त्यांनी निवडलेला नेता पाहता येईल. तिथूनच ते व्हाईट हाऊसला पोहचतात.
व्हाईट हाऊसमध्ये ट्रांजिशन टीम बनवली जाते जी सुरुवातीला सर्व बदलांची यादी करते. कुणी काय काम करायचे, किती वेळात करायचे हेदेखील निश्चित असते. अनेकदा मॉक ड्रील होते, सर्वकाही ठीक असेल तेव्हा व्हाईट हाऊसचा पर्मनंट स्टाफ पहाटे ४ पासून कामाला लागतो. बहुतांश लोक रात्रभर जागतात.
व्हाईट हाऊसमधील बदलाच्या कामासाठी ५०० हून अधिक कर्मचारी असतात. त्यांना रिपब्लिकन असो वा अन्य पक्षाचा राष्ट्रपती याने काही फरक पडत नाही. विद्यमान राष्ट्रपती जाईपर्यंत तिथे अनेक निर्णय होतात आणि बैठका घेतल्या जातात. अखेरच्या दिवसापर्यंत विद्यमान राष्ट्रपती व्हाईट हाऊसमध्ये असतात
शपथ ग्रहणाच्या आदल्या रात्रीपासून पॅकिंगला सुरुवात होते. त्याचवेळी नव्या राष्ट्रपतींचे सामान आलेले असते परंतु हे पॅकिंग शपथविधीच्या दिवशीच उघडले जाते. सकाळी १० च्या सुमारास जुन्या राष्ट्रपतींचा निरोप होतो. त्याआधी सर्व स्टाफ डायनिंग रुममध्ये जमा होतो. त्यांच्या कालावधीत व्हाईट हाऊसवर फडकणारा झेंडा भेट म्हणून दिला जातो.
५५ हजार स्क्वेअर फूट व्हाईट हाऊसमध्ये आधी कुटुंबाचं सामान येते मग तिथला स्टाफ ते ताब्यात घेतो. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपतींच्या पसंतीची काळजी घेतली जाते. भिंतीवरील जुने पेटिंग हटवले जाते. कार्पेट आणि तिथल्या फोनचे रंगही बदलण्यात येतात. ट्रम्प त्यांच्या पसंतीच्या गोष्टींसाठी खूप सक्रीय असतात.
वॉशरूम, पॅन्ट्री, मेन किचन तिथे बदलले जातात. पॅन्ट्रीत साहित्यांचा स्टॉक बनवला जातो. व्हाईट हाऊसच्या कार्यालयात एक गोष्ट बदलली जात नाही ती म्हणजे रिजॉल्यूट डेस्क, जिथे गल्या अनेक दशकापासून अमेरिकेचे राष्ट्रपती काम करतात. विशेष म्हणजे व्हाईट हाऊसमधील बदलांसाठी बाहेरच्या व्यक्तींना काम दिले जात नाही. तिथला स्टाफ ही सर्व कामे करतो.