परिस्थिती गंभीर! "या" देशात कोरोना बळींची संख्या एक लाखावर, पंतप्रधानांनी स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:14 PM2021-01-27T16:14:59+5:302021-01-27T16:26:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात असून कठोर नियम देखील लागू करण्यात येत आहेत.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दहा कोटींवर पोहोचली आहे. एकूण रुग्णांचा आकडा हा 100,904,378 हून अधिक आहे. तर आतापर्यंत 2,169,184 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात 72,943,641 लोकांनी कोरोनावर मात केली असून अनेक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात असून कठोर नियम देखील लागू करण्यात येत आहेत.

कोरोना व्हायरसवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान कोरोना बळींची संख्या ही एक लाखांहून अधिक झाली आहे.

मंगळवारी ब्रिटनमध्ये मृतांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या गंभीर परिस्थितीची जबाबदारी स्विकारत दु:ख व्यक्त केलं आहे. याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत आहे. कोरोना व्हायरसने झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाच्या संसर्गाने अनेकांनी आपले आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं गमावली आहेत. या कुटुंबीयांचे दु:ख मोठं असल्याचं जॉन्सन यांनी म्हटंल आहे. एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आमच्या सरकारने, मंत्र्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. या महामारीचा विचार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संधी आहे. लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मृत्यू आकलन प्रमाणपत्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक लाख चार हजार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णांची संख्याही जास्त आहे.

राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अधिकारी क्रिस हॉपसन यांनी कोरोनामुळे एक लाख जणांचा मृत्यू होणं ही अतिशय दुखद बाब असल्याचं म्हटलं आहे. लस घेण्यासाठी सर्वच समुदायाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचं लसीकरणाचे प्रभारी मंत्री नदीम जहावी यांनी सांगितलं आहे.

कोरोना लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.