धक्कादायक! कोरोनाची लस घेणं पडलं महागात, 13 जणांना Facial Paralysis; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:51 PM2021-01-18T12:51:47+5:302021-01-18T13:01:41+5:30

Corona Vaccine And Facial Paralysis : जगभरात अनेक ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र काही लसींचे साईड इफेक्ट देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लसीकरणानंतर काहींचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकर पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांच्या संख्येने नऊ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 95,488,181 वर पोहोचला आहे. तर 2,039,712 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे.

जगभरात अनेक ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र काही लसींचे साईड इफेक्ट देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लसीकरणानंतर काहींचा मृत्यू झाला आहे. तर काहींना वेगवेगळ्या त्रासाने ग्रासलं आहे.

इस्रायलमध्ये देखील अशीच काहीशी घटना घडली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर 13 जणांना फेशियल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याची धडकी भरवणारी घटना घडली आहे.

WION दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साईड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकजण कोरोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवला आहे.

"मला जवळजवळ 28 तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत होता. त्यानंतरही हे पूर्णत: ठीक झालेले नाही" अशी माहिती एका व्यक्तीने व्हायनेटशी बोलताना दिली आहे. तसेच इंजेक्शन दिलं त्याठिकाणी थोडं दुखत असल्याचं देखील म्हटलं आहे.

इस्रायलमध्ये 20 डिसेंबर 2020 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 72 टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी आता दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. धोक्याचा इशारा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबतचे वृत्त दिले आहे.

नॉर्वे या देशात लसीकरण मोहिमेत फायझरची कोरोना लस दिल्यानंतर काही काळातच 23 वयोवृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची नॉर्वे सरकारकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

फायझरची कोरोना लस घेतल्यानंतर अनेक लोक आजारी पडल्याचेही उजेडात आले आहे. लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत.

फायझरची लस घेतल्यानंतर 80 वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले. मरण पावलेल्या 23 पैकी 13 जणांमध्ये ताप येणे, अतिसार ही लक्षणे आढळून आली. एमआरएनए प्रकारची लस घेतली की अशी लक्षणे आढळतात.

कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे. मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती.लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे.