CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:25 PM2020-08-09T15:25:11+5:302020-08-09T15:45:17+5:30

कोरोना व्हायरस हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरसवरील लसीच्या प्रतिक्षेत आहे. आणि लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. भारत, इंग्लंड, रशिया, अमेरिका, इस्रायलसह अनेक देश लसीच्या फार जवळ पोहोचले आहेत.

रशियाने तर जगातल्या पहिल्या कोरोना लसीचा दावाही केला आहे. रशिया 12 ऑगस्टला या लसीची नोंदनी करणार आहे. मात्र, ही लस कितपत परिणामकारक ठरेल, यासंदर्भात इंग्लंड, अमेरिका आदी देश शंका उपस्थित करत आहेत. तसेच इतर लसींच्या बाबतीतही अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे, की केवळ लसच पुरेशी ठरणार नाही.

कोरोनासंदर्भात झालेल्या अनेक प्रकारच्या अध्ययनांतून सांगण्यात आले आहे, की लठ्ठ लोकांना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. आता तर एका नव्या अध्ययनात, लठ्ठ लोकांत कोरोना लस अधिक परिणामकारक ठरणार नाही, अशी शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

अमेरिकेतील अलबामा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शक्यता वर्तवली आहे, की लठ्ठ लोकांवर सार्स-कोव-2 व्हायरसशी लढणारी लस फारशी प्रभावी ठरणार नाही. पूर्वीपासूनच उपलब्ध असलेल्या काही लसींचे उदाहरण देत त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

अलबामा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आपल्या अभ्यासत फ्लू आणि हेपेटायटिस-बीच्या लसींचे उदारहणं दिले आहेत. 2017 मध्ये झालेल्या संशोधनात म्हणण्यात आले आहे, की अधिक वजन असणाऱ्या लोकांवर, संबंधित संक्रमणाचा सामना करण्यात या दोन्ही लसी फारशा प्रभावी ठरल्या नव्हत्या आणि त्यांच्या शरिरात सक्षम अंटीबॉडीज तयार होऊ शकल्या नव्हत्या.

अध्ययनात सांगण्यात आले आहे, की लठ्ठ लोकांना फ्लू आणि हेपेटायटिसच्या संक्रमणाच्या बाबतीत ते अधिक संवेदनशील असतात. अशा लोकांमध्ये गंभीर संक्रमणाबरोबरच अंग खराब होने आणि मृत्यू होण्याचा धोकाही अधिक असतो. कोरोनावरील प्रभावी लसीच्या बाबतीतही अशीच स्थिती निर्माण होऊ शकत.

टी-सेल्स आणि मयक्रोफेजची कमतरता - या अध्ययनाचे मुख्य संशोधक डॉ. चाड पेटिट यांनी, लठ्ठ माणसांत संक्रमण रोखणविरोधी लसी कमी प्रभावी ठरण्यामागची दोन मुख्य कारणं सांगितली आहेत.

एक - टी-सेल्सचे व्यवस्थित काम न करणे. टी-सेल्स याच इम्यून सिस्टमला अंटीबॉडीज तयार करण्याचा मेसेज देत असतात.

दोन - रोगप्रतिकारशक्ती सक्रिय झाल्याने शरीरावर सूज येते. यामुळे 'मायक्रोफेज' नावाच्या विशेष पेशींचे उत्पादन कमी होती. मायक्रोफेज, शरीरातील घातक गोष्टी नष्ट करण्यसाठी महत्वपूर्ण मानल्या जातात.

सुईचा आकारही अत्यंत महत्वाचा - वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विल्यम शैफनर यांच्या मते, लठ्ठ लोकांत लस देतांना सुईचा आकारही महत्वाचा ठरतो. सर्वसाधारण पणे एक इंचाची सुईच वापरली जाते. यामुळे लठ्ठ लोकांत इम्यूनिटी तयार होण्याची शक्यता कमी होते. त्यांना थोड्या मोठ्या आकाराच्या सुईने लस, द्यायला हवी. जेने करून संबंधित लस त्यांच्या स्नायुंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचेल.

लसीकरण अत्यंत आवश्यक - डॉ. शैफनर यांनी एका गोष्टीवर प्रकर्षाने भर दिला आहे, ते म्हणतात, फ्लू आणि हेपेटायटिस-बी प्रमाणेच कोरोना लस ही भलेही लठ्ठ लोकांवर अधिक प्रभावी न ठरो, मात्र, त्यांना निश्चितपणे काही प्रमाणात सुरक्षा प्रदान करते.

याचा अर्थ व्हायरसचे संक्रमण झालेच तर, ते संक्रमण गंभीर होणे अथवा मृत्यू होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्यामुळे परिणामांचा विचार करण्यापेक्षा लसिकरण करणे अधिक आवश्यक आहे. ते नश्चितपणे करायला हवे.