coronavirus: दर हजार कोरोनाबाधितांपैकी एवढ्या रुग्णांचा होतोय होतोय मृत्यू, WHO ने पुन्हा दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 12:11 PM2020-08-04T12:11:47+5:302020-08-04T12:20:06+5:30

कोरोना विषाणूचा जगाला बसलेला विळखा अध्याप सैल झालेला नाही. जगभरात दररोज लाखो रुग्णांचे निदान होत असून, हजारो रुग्ण या विषाणूची शिकार ठरत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूबाबत पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होणाऱ्या लोकांमधील मृत्यूदर हा दर हजार रुग्णांमागे सहा एवढा आहे, असे डब्ल्यूएचओच्या साथीच्या आजारांसंबंधीच्या प्रमुख तज्ज्ञ डॉ. मारिया वेन केरखोव यांनी सांगितले. काही संशोधनामधून ही माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. हा आकडा मोठा दिसत नसला तरी प्रत्यक्षात तो खूप मोठा आहे. कारण दर १६७ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत आहे.

डिसेंबरमध्ये कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ६.९ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्युदराच्या नव्या अभ्यासानुसार जगात आतापर्यंत ११.५ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. हा आकडा रुग्णांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा सात पटीने अधिक आहे.

जगभरात लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, मात्र त्यांची कोरोना चाचणी झाली नाही, असे मानण्यात येत आहे. विशेषकरून कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात अनेक देशांकडे चाचण्या घेण्याची क्षमता खूप कमी होती.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड डॉ. मारिया वेन केरखोव यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्युदर शोधण्यासाठी संशोधकांची अनेक पथके काम करत आहेत. मात्र प्रत्यक्षात किती लोकांना संसर्ग झालाय, हे आम्हाला ठाऊक नाही. मात्र काही संशोधनामधून मृत्यूचा दर हा ०.६ टक्के आहे.

यापूर्वीच्या संशोधनामध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांचा मृत्युदर हा ०.८ टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. तर केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संस्थेच्या अंदाजानुसार हा दर १.४ टक्के असू शकतो.