coronavirus: या देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा नियम तोडला, दुप्पट दंड भरावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 12:28 PM2020-06-01T12:28:01+5:302020-06-01T12:37:08+5:30

स्वत:च्याच सरकारने केलेले लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी एका देशाच्या पंतप्रधानांना दुप्पट दंड भरावा लागल्याची घटना समोर आली आहे.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, स्वत:च्याच सरकारने केलेले लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी एका देशाच्या पंतप्रधानांना दुप्पट दंड भरावा लागल्याची घटना समोर आली आहे.

हा प्रकार युरोपमधील रोमानिया या छोट्याच्या देशात घडला आहे. रोमानियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधान लुडोविक ओरबान यांनी नियमभंग केल्याचे उघडकीस आले आहे.

रोमानियाचे पंतप्रधान लुडोविक ओरबान हे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत कुठलेही सोशल डिस्टंसिंग न पाळता धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसून आले.

पंतप्रधानांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर स्वत:च तयार केलेला नियम मोडल्याप्रकरणी पंतप्रधान लुडोविक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार हे छायाचित्र पंतप्रधान लुडोविक यांच्या जन्मदिनी २५ मे रोजी काढण्यात आले होते. यामध्ये ते धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसून आले. तसेच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कसुद्धा परिधान केलेला नव्हता.

या बैठकीमध्ये रोमानियाचे वित्त आणि परराष्ट्रमंत्रीही सहभागी झाले होते. रोमानियामध्ये आतापर्यंत कोरोनाचे १९ हजार १३३ रुग्ण सापडले असून, आतापर्यंत १२५९ जणांचा मृत्यू झाला आहे.