Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनावर बनली प्रभावी लस; व्हायरससोबत लढण्याची वाढवते ताकद!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 11:23 AM2020-04-03T11:23:16+5:302020-04-03T11:27:03+5:30

जगभरात कोरोना विषाणूच्या लसीबाबत संशोधन चालू आहे. आमच्या देशात लस बनली आहे असा दावा विविध देश करत आहेत. दरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी अशी लस तयार केली आहे ज्यामुळे कोरोनाचं संक्रमण प्रभावीपणे थांबवता येत आहे.

जगातील शास्त्रज्ञ या प्राणघातक विषाणूचं औषध शोधत आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणूनच, लवकरात लवकर कोरोनाशी मुकाबला करण्याची लस शोधण्याबाबत शास्त्रज्ञांना चिंता आहे.

पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की त्यांनी कोविड -१९ कोरोना विषाणूची लस इतर देशांपेक्षा खूप लवकर विकसित केली आहे. या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीसाठी या लोकांनी सार्स (SARS) आणि मर्स (MERS) च्या व्हायरसचा आधार घेतला.

पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहाय्यक प्राध्यापिका अँड्रिया गॅम्बोटो म्हणाल्या की, हे सार्स आणि मर्स विषाणू नवीन कोरोना विषाणू कोविड -१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सारखेच आढळतात. या तिन्हीच्या स्पाइक प्रोटीन (विषाणूची बाह्य थर) ओळखणे फार महत्वाचे आहे जेणेकरुन मानवांना या विषाणूपासून मुक्तता मिळू शकेल हे यावरून आम्हाला शिकायला मिळाले.

प्रोफेसर अँड्रिया गॅम्बोटो म्हणाल्या की व्हायरस कसा मारावा? त्याला कसं हरवावं? याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही आमची लस उंदरांवर वापरुन पाहिली आणि त्याचे परिणाम खूप सकारात्मक होते.

आम्ही पिटगोवॅक असं या लसीचं नाव ठेवलं आहे. या लसीच्या प्रभावामुळे, उंदराच्या शरीरात अँन्टीबॉडीज तयार झाल्या त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्याची क्षमता मिळाली. असं प्रोफेसर अँड्रिया गॅम्बोटो म्हणाल्या.

त्याचसोबत कोविड -१९ कोरोना विषाणू रोखण्यासाठी शरीराला आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज पिटगोवॅक लस पूर्ण करीत आहेत. आम्ही लवकरच मानवांवर याची चाचणी सुरू करू असं प्रोफेसर अँड्रिया गॅम्बोटो यांनी सांगितले.

पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनची ही टीम येत्या काही महिन्यांत मानवांवर या लसीची चाचणी सुरू करेल. ही लस इंजेक्शनसारखी नाही. हे एका चौरस पॅचसारखी आहे, जी शरीराच्या कोणत्याही ठिकाणी चिकटलेले जाऊ शकते.

या पॅचचा आकार बोटाच्या टिपाप्रमाणे आहे. या पॅचमध्ये साखरेपासून बनविलेल्या 400 हून अधिक सुया आहेत. या पॅचद्वारे, त्यामध्ये असलेले औषध शरीरात नेले जाते. लस देण्याची ही पद्धत खूप नवीन आणि प्रभावी आहे.

तथापि, या अँटीबॉडीचा प्रभाव उंदराच्या शरीरावर किती काळ राहील, हे गॅम्बोटोच्या टीमने स्पष्ट केले नाही. परंतु आम्ही गेल्या वर्षी मर्स (MERS) विषाणूसाठी लस तयार केली होती जी खूप यशस्वी झाली असं टीमने सांगितले आहे.