CoronaVirus News: पाकिस्ताननं कसा रोखला कोरोना?; अखेर सत्य समोर आले; इम्रान खान तोंडावर पडले

By कुणाल गवाणकर | Published: September 21, 2020 07:00 PM2020-09-21T19:00:42+5:302020-09-21T19:07:38+5:30

एकीकडे भारतात दररोज कोरोनाचे ९० हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ लाखांच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे पाकिस्ताननं कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखल्याबद्दल संयुक्त राष्ट्रापासून ते जागतिक आरोग्य संघटनेपर्यंत सगळ्यांनीच पाकिस्तानचं कौतुक केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. मात्र आता पाकिस्तानमधून एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेमाटोलॉजीच्या डॉक्टर समरीन कुलसूम यांनी दिलेल्या माहितीमुळे खान यांच्या दावाची पोलखोल झाली आहे. पाकिस्तानातील कोरोना संक्रमणाला कसा ब्रेक लागला, हे समरीन यांनी सांगितलं आहे.

'कोणत्याही विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर शरीरात एँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज वातावरणात असलेल्या विषाणूपासून (कोरोना) शरीराचं संरक्षण करतात,' असं समरीन यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जर्नल ऑफ पब्लिकमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलं आहे.

जुलै २०२० पर्यंत कराचीतली ४० टक्के जनता कोरोना बाधित होती. मात्र यातल्या ९० टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती, अशी आकडेवारी समरीन यांनी अहवालात दिली आहे.

कराचीतल्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यानं कोरोना रुग्णांची संख्या घटली. याशिवाय कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली, असं समरिन यांनी अहवालात नमूद केलं आहे.

'जुलै ते सप्टेंबर दरम्यान कराचीतल्या ६० टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी विकसित होऊ शकेल,' असं समरिन यांनी पाकिस्तानतलं प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या 'एक्स्प्रेस ट्रिब्युन'ला सांगितलं.

कराचीसह संपूर्ण पाकिस्तानात जंतूसंसर्ग आहे. त्यामुळे लोकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं निरीक्षण समरीन यांनी नोंदवलं.

पाकिस्तानात कोरोनाची दुसरी लाट आली तरीही फार नुकसान होणार नाही, असा दावा डॉ. समरीन यांनी केला. त्यामागचं कारणही त्यांनी आकडेवारीसह सांगितलं.

पाकिस्तानातल्या ६० ते ७० टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यास कोरोनाची दुसरी लाट आल्यासही देश सुरक्षित राहील. त्यामुळे लसीची गरजही भासणार नाही, असं समरिन म्हणाल्या.

पाकिस्तानातल्या कोरोना बाधितांचा आकडा सध्या ३ लाख ६ हजार ३०४ इतकी आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ६ हजार ४२० जणांचा मृत्यू झाला आहे.