CoronaVirus News : ऑक्सफोर्डची कोरोनावरील लस लवकरच तयार होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 05:45 PM2020-08-17T17:45:19+5:302020-08-17T18:00:38+5:30

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी रशियाकडून लस तयार करण्यात आल्याचे जाहीर झाल्यानंतर आता इतर देशांकडूनही लस तयार होण्याची बातमी लवकरच येऊ शकते. काही महिन्यांत ऑक्सफोर्डच्या कोरोना विषाणूच्या लसीचा निकालही समोर येऊ शकेल.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि जर्मनीची कोरोनावरील लस या वर्षाच्या अखेरीस तयार होऊ शकेल, असे ब्रिटनच्या लसीकरण टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमधील जवळपास एक लाख लोकांनी कोरोनावरील लसीच्या चाचणीत भाग घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे केट बिंघम म्हणाले. तसेच, केट बिंघम यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत यापेक्षा अधिक स्वयंसेवकांना या चाचणीत सामील होण्यासाठी आवाहन केले.

केट बिंघम म्हणाले, 'मला वाटते की यावर्षी ही लस तयार होईल. एक लस ऑक्सफोर्ड विद्यापीठात तयार केली जात आहे आणि दुसरी लस जर्मन कंपनी बायोटेक यांनी विकसित केली आहे.'

जर सर्व काही व्यवस्थित झाले तर यावर्षी या दोन्ही लसींची नोंदणी करण्यात येईल आणि यंदा वितरण देखील सुरू केले जाईल, असे केट बिंघम यांनी सांगितले.

कोरोनावर मात करण्यासाठी अमेरिकन औषध कंपन्या देखील अनेक लसींवर वेगाने काम करत आहेत. अमेरिकन कंपनी Novavaxने जाहीर केले आहे की, कंपनी दक्षिण आफ्रिकेत लसीची चाचणी सुरू करीत आहे. NVX-CoV2373 लसीचा टप्पा -2 बी चाचणी सुमारे 2665 निरोगी लोकांवर केली जाईल.

दुसरीकडे, चीनने CanSino Biologics Inc या कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या पेटंटला मान्यता दिली आहे. ही कंपनी रशिया, ब्राझील, मेक्सिको, सौदी अरेबियासह अनेक देशांमध्ये चाचण्या सुरू करणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर पडत आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे.

तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे.

देशात कोरोना बळींची संख्या 50000 ओलांडली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 63,489 नव्या रुग्णांची भर पडली. तर 944 जणांचा मृत्यू झाला आहे.