CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 11:37 AM2020-08-08T11:37:24+5:302020-08-08T11:56:47+5:30

अमेरिकन सरकारमधील कोरोना व्हायरस अ‍ॅडव्हायझर आणि देशातील मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अ‍ॅथनी फाउची यांनी म्हटले आहे, की कोरोना लस पूर्णपणे प्रभावी असण्याची (जसे 98 टक्के) शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र, लस 50 टक्के प्रभावी असली तरीही तिचा स्वीकार केला जाईल.

अँथनी फाउची यांनी म्हटले आहे, की वैज्ञानिक ज्या लसीवर काम करत आहेत. ती किमान ७५ टक्के तरी प्रभावी व्हावी, अशी त्यांना आशा आहे. मात्र, लस 50 ते 60 टक्के प्रभावी असली, तरी तीचा स्वीकार केला जाणार आहे.

ब्राउन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका कार्यक्रमात भाग घेताना फाउची म्हणाले, कोरोना लसीची 98 टक्के प्रभावी होण्याची शक्यता कमी आहे. ते म्हणाले, लस एक टूल आहे, जिच्या सहाय्याने महामारीवर नियंत्रण मिळवता येईल. हा विचारही आपल्याला करावा लागेल.

अमेरिकेच्या फूड अॅड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे, की जर कोरोना लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आणि ती 50 टक्के जरी प्रभावी असली तरी तिला मंजुरी देण्यात येईल. मंजूरी मिळाल्यानंतर कोणतीही लस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊ शकते.

अमेरिकेत अनेक लसींवर काम सुरू आहे. तसेच अनेक लसींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या चाचणींचे निकाल चांगले आल्यास ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

अमेरिकेत Pfizer आणि Modernaची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी 30 हजार लोकांचा समावेश करत आहे.

अनेक तज्ज्ञांचे मत आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीचे निकाल समोर येतील.

दुसरीकडे रशियाने आपल्या लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या रशियन कोरोना लसीसंदर्भात फारशी माहिती समोर आलेली आहे.

WHOचे प्रमुख टेड्रोस अॅडहॅनम घेब्रियेसुस यांनी म्हटले आहे, की वैज्ञानिक चांगली आणि प्रभावी लस तयार करण्यात यशस्वी होतील, अशी आशा आहे. मात्र, खात्री नाही. असेही होऊ शकते, की यावरील लस तयारच होणार नाही.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. कोरोनापुढे संपूर्ण जगाने अक्षरशः गुडघे टेकले आहेत. अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत.

भारतातही कोरोना लसींवर वेगाने काम सुरू आहे.