coronavirus: शास्त्रज्ञांना मोठं यश, आता कोरोना विषाणूचा शरीरात सहजपणे होणार नाही प्रवेश

By बाळकृष्ण परब | Published: November 9, 2020 03:51 PM2020-11-09T15:51:56+5:302020-11-09T15:57:22+5:30

coronavirus News : कोरोनाला रोखण्यासाठीचे उपाय, लस यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाला रोखण्यासाठीचे उपाय, लस यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे.

अमेरिकेत शास्त्रांनी काही अशा रासायनिक संयुगांचा शोध लावला आहे जी कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकतात. तसेच ही संयुगे कोरोना विषाणू आपल्यासारखा अन्य विषाणू तयार करण्यास आवश्यक असलेल्या दोन प्रोटिन यांना बाधित करू शकतात. या संयुगांच्या मदतीने कोविड-१९ विरोधात प्रभावी लस तयार करू शकतात.

कोविड-१९ ला कारणीभूत ठरणारा सार्स-कोव्ह-२ विषाणू अनेक टप्प्प्यांमध्ये शरीरावर हल्ला करतो. हा आधी फुप्फुसामध्ये प्रवेश करतो आणि मानवी शरीरातील पेशींच्या रचनेवर कब्जा करून आपल्यासारखे अन्य विषाणू तयार करतात. या दोन्ही बाबी सुरुवातीच्या टप्प्यातील संसर्गाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात.

सायंस अॅडव्हांसेज या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अध्ययनामध्ये दिसून आले की, सध्या उपलब्ध असलेल्या अनेक रासायनिक संयुगांमध्ये मानवी पेशींमधील संसर्ग निर्माण करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या लायझोसोमल प्रोटिन कॅथेप्सिन एन प्रोटीन आणि पेशींमध्ये विषाणू तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्य प्रोटिन अॅप्रो ला बाधित करू शकतो.

अमेरिकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिया हेल्थ मध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या यू चेन यांनी सांगितले की, जर शास्त्रज्ञांनी या दोन्ही प्रक्रियांना रोखण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्षम संयुगे विकसित केली तर कोरोना विषाणूवरील उपचारात मदत मिळू शकते. हे संशोधन करणाऱ्या पथकामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाचे संशोधकसुद्धा सहभागी होते.