coronavirus: कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली

By बाळकृष्ण परब | Published: January 14, 2021 06:37 PM2021-01-14T18:37:11+5:302021-01-14T18:46:37+5:30

Coronavirus News : कोरोनामुक्त रुग्णांकडून कोरोनाचा संसर्ग होत नाही, हा दावा खोडून काढणारा नवा शोध ब्रिटीश संशोधकांनी समोर आणला आहे.

कोरोना विषाणू आणि कोविड-१९ च्या संसर्गाबाबत होत असलेल्या संशोधनामधून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. त्यामधून आधीची माहिती खोडून काढणारे निष्कर्ष समोर येत आहे. दरम्यान, कोरोनामुक्त रुग्णांकडून कोरोनाचा संसर्ग होत नाही, हा दावा खोडून काढणारा नवा शोध ब्रिटीश संशोधकांनी समोर आणला आहे.

आधीच कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये किमान पाच महिने कोरोनाविरोधातील रोगप्रतिकार क्षमता राहते. यादरम्यान, सदर व्यक्ती पुन्हा संक्रमित होत नाही. मात्र अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांना कोरोना होऊ शकतो, असा दावा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी या संशोधनामधून केला आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंड ने केलेल्या विश्लेषणामधून समोर आले की, संसर्गानंतर विकसित होणारी रोगप्रतिकारशक्ती ही आधी संक्रमित न झालेल्या लोकांपेक्षा ८३ टक्के अधिट संसर्गापासून रक्षण करते. तसेच पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर किमान पाच महिन्यांपर्यंत रोगप्रतिकार शक्ती टिकून राहते.

मात्र या संशोधनामधून शास्त्रज्ञांनी एक चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती विकसित झाली आहे. तेसुद्धा आपल्या नाक आणि गळ्यामधून विषाणूचे वाहक ठरू शकतात. त्यांच्यापासून अन्य निरोगी व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो.

पीएचईमधील वरिष्ठ चिकित्सा सल्लागार प्राध्यापक सुझान हॉपकिन्स यांनी सांगितले की, या अभ्यासामधून आम्ही कोविड-१९ विरोधात अँटीबॉडीमधून संरक्षणाचे एक स्पष्ट नैसर्गिक चित्र दिसले आहे. मात्र प्राथमिक निष्कर्षांचा लोकांनी चुकीचा अर्थ काढू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

सुझेन हॉपकिन्स यांनी सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, ज्या लोकांमध्ये संसर्ग झाला आहे आणि ज्यांच्यामध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये बहुतांश जण संसर्गापासून सुरक्षित आहेत. मात्र हे संरक्षण किती काळापर्यंत मिळेल, हे आतापर्यंत समजू शकलेले नाही. आम्हाला वाटते की, संसर्गातून मुक्त झाल्यानंतरही काही लोकांमधून विषाणू पसरू शकतो.