शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: चिंता वाढली! कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी मांडलेली ती थियरी निष्प्रभ ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 8:15 AM

1 / 7
कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यामध्ये हर्ड इम्युनिटी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा निष्कर्ष बहुतांश तज्ज्ञांनी काढला होता. हर्ड इम्युनिटीमुळे बहुतांश लोकांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण होऊन त्या कोरोनाचा सामना करतील, असा संशोधकांचा होरा होता.
2 / 7
या सिद्धांतानुसार एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के लोक संक्रमित झाल्यानंतर कोरोनाच्या संसर्गापासून मानवजातीची मुक्तता होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र आता शास्त्रज्ञांनी मांडलेल्या या थिअरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्पेनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हर्ड इम्युनिटीमुळे कोरोनाविरोधात लढता येण्याबाबत शंका आहे, अशी बाब समोर आली आहे.
3 / 7
आरोग्य क्षेत्रातील संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या द लेसेंट या नियतकालिकामध्ये हर्ड इम्युनिटीबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. स्पेनमध्ये ६१ हजार लोकांमध्ये केलेल्या निरीक्षणादरम्यान, केवळ ५ टक्के लोकांमध्येच अँटीबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले आहे. स्पेनमध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर हे संशोधन करण्यात आले.
4 / 7
या अभ्यासासाठी एकूण ३५ हजार कुटुंबामधून रँडम सॅम्पलिंग करण्यात आली. तसेच २७ एप्रिल ते ११ मे दरम्यान एकूण ६१ हजार ०७५ लोकांनी कोरोना विषाणूसंदर्भात लक्षणे आणि धोक्याबाबत संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यांची सीपरोप्रीवेलेंस आणि इम्युनोएसेची दोन स्तरांवर तपासणी करण्यात आली. त्यामधून काही लोकांमध्ये दोन्ही चाचण्यांमध्ये आयजीजी अँटिबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. तर काही लोकांमध्ये दोन पैकी एका चाचणीत अँटीबॉडी दिसून आली.
5 / 7
संशोधकांनी दोन प्रकारे केलेल्या तपासाचे विश्लेषण केल्यानंतर पॉईंट ऑफ केअर टेस्टमध्ये सीरोचे अस्तित्व पाच टक्के आणि इम्युनो चाचणीमध्ये त्याचे अस्तित्व ४.६ टक्के दिसून आले. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तपासामध्ये लिंगाच्या आधारावर काहीही फरक दिसून आला नाही.
6 / 7
मात्र प्रदेशवार या चाचण्यांच्या निष्कर्षात फरक दिसून आला. उदाहरण द्यायचे तर माद्रिदच्या आसपासच्या भागात १० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये आयजीजी अँटिबॉडी दिसून आली. तर किनारपट्टीवरील भागात केवळ ३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी दिसून आल्या. या संशोधनामधून स्पेनमधील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येत कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता विकसित झाली नसल्याचे दिसून आले. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्येही खूपच कमी लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसले.
7 / 7
पीसीआरच्या चाचणीमधून पॉझिटिव्ह आलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये अँटिबॉडी दिसून आल्या, मात्र कोरोनाची लक्षणे असलेल्या बऱ्याच लोकांची पीसीआर चाचणी झालेली नाही. तसेच सीरॉलॉजीच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत सुमारे एक तृतियांश लोकामध्ये कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याscienceविज्ञानHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय