Corona Vaccine : कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर ठेवणं योग्य?; रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:10 PM2021-07-26T12:10:47+5:302021-07-26T14:27:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर असावं याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनापुढे अनेक प्रगत देशही हतबल झाले आहेत.

जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर असावं याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान रिसर्चमधून याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.

फायजर-बायोएनटेक लसीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अँटीबॉडी आणि टी-सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचं ब्रिटीश संशोधकांनी म्हटलं आहे. रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम, न्यू कॅसल, लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन कोरोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर-बायोएनटेकच्या लसीबाबत सखोल संशोधन करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टी सेल आणि अँटीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचं संशोधकांना आढळून आले आहे.

जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लसीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात कोरोनापासून बचाव होतो आणि लसीच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे.

शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ. तुषाण डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्स-सीओव्ही-2 लसीनंतर अँटीबॉडी आणि टी-सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले. या संशोधनात 503 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

ब्रिटनने दोन डोसच्या दरम्यान अधिक कालावधी ठेवण्यास मंजुरी दिली आहे. लसीच्या दोन डोसमध्ये अंतर ठेवल्याने अँटीबॉडीचा स्तर अधिक असतो. मात्र, दोन डोस दरम्यान अधिक वाढलेल्या अंतरामध्ये अँटीबॉडीचा स्तर काहीसा कमी होतो.

टी-सेलची क्षमता अधिक वाढते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीच्या डोसची आवश्यकता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

डब्ल्यूएचओ साथीच्या आजाराबाबत दर आठवड्याला देत असलेल्या माहितीमध्ये डेल्टा व्हायरसच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा विविध देशांचा प्रयत्न असला तरी विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये झाली असून 3,50,273 नवे रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 2,96,447 नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये 2,87,610 नवे रुग्ण, भारतामध्ये 2,68,843 नवे रुग्ण, अमेरिकेमध्ये 2,16,433 नवे रुग्ण आढळून आले.

20 जुलैपर्यंत कोरोनाचे 24 लाख नमुने जिनोमिक माहितीसाठी पाठविण्यात आले. त्यातील दोन लाख 20 हजारांहून अधिक नमुने डेल्टा प्रकाराचे असल्याचे दिसले. डेल्टामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे.

डेल्टामुळे कोरोनाच्या इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून येत्या काळात डेल्टाचाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू 180 देशांत, बीटा प्रकारचे विषाणू 130 देशांत, गॅमा प्रकारचे 78 देशांत, तर डेल्टा प्रकारचे 124 देशांत रुग्ण नोंदविले गेले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!