Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि 10 कोटी जिंका; 'या' ठिकाणी आहे भन्नाट ऑफर, जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:20 AM2021-05-31T09:20:43+5:302021-05-31T09:37:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : जगात असाही देश आहे, जिथे लस घेणाऱ्यांना 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचं बक्षीस जिंकण्याची संधी दिली जात आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

भारतातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे.

लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे.

अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना विविध भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान आणखी एका देशातही नागरिकांना लस घेतल्यानंतर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.

जगात असाही देश आहे, जिथे लस घेणाऱ्यांना 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचं बक्षीस जिंकण्याची संधी दिली जात आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हाँगकाँगमध्ये एका डेव्हलपरने लस घेण्याऱ्यांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे.

ऑफरनुसार, जर तुम्ही लस घेतली तर तुम्हाला बक्षीस म्हणून 1.4 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी इतकी रक्कम मिळू शकते. मात्र, ही रक्कम कॅशच्या स्वरुपात न देता लॉटरीच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि विजेत्याला या किमतीची अपार्टमेंट गिफ्ट दिली जाईल.

सिनो ग्रुप नावाच्या कंपनीने टेंक फोंग फाउंडेशनसोबत मिळून लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही ऑफर दिली आहे. कंपनीने म्हटलं आहे, की विजेत्याला ग्रँड सेंट्रल प्रोजेक्टअंतर्गत एक ब्रँड न्यू अपार्टमेंट ऑफर केली जाईल.

हाँगकाँगमध्ये कोरोना लस घेतलेले लोक हे लकी ड्रॉ जिंकण्यासाठी पात्र असतील. या ऑफरमध्ये अलिशान घर गिफ्ट म्हणून दिलं जाईल. लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी सरकारकडूनही विविध ऑफर दिल्या जात आहेत.

सरकार कोरोना लसींचे डोस डोनेट करण्याचाही विचार करत आहे, कारण ऑगस्टपर्यंत काही डोस एक्सपायर होणार आहेत. या देशात लसीकरणासाठी लोक घराबाहेरही निघायला तयार नाहीत.

जवळपास 75 लाख लोकसंख्या असलेल्या हाँग काँगमध्ये आतापर्यंत केवळ 12 टक्के जनतेनंच लस घेतली आहे. तर शेजारी देश सिंगापूरमध्ये 28 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या महाभयंकर संकटात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.

5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

9 मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, 30 मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.