Omicron Variant: टेन्शन नको! ओमायक्रॉनबाबत नवी माहिती समोर; अमेरिकन तज्ज्ञांचा चिंतामुक्त करणारा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:46 AM2021-12-07T06:46:19+5:302021-12-07T06:50:22+5:30

ओमायक्रॉन विषाणूबाबत अधिक अभ्यासाची गरज:अमेरिकेतील प्राथमिक अभ्यासाचा निष्कर्ष

ओमायक्रॉन हा विषाणू जगभर वेगाने पसरत असला, तरी तो डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे प्राथमिक अभ्यासातून आढळले आहे, असे साथीच्या रोगांचे अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. ॲन्थनी फौसी यांनी सांगितले. मात्र, ओमायक्रॉनच्या संसर्गाचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ओमायक्रॉन हा विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ते म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी संसर्गाचे प्रमाण कमी होते. मात्र, नव्या विषाणूमुळे त्या देशात रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. ओमायक्रॉनबद्दल आत्ताच ठोस विधाने करणे शक्य नाही.

मात्र, डेल्टाइतकी या नव्या विषाणूची संसर्गशक्ती नसल्याचे प्राथमिक अभ्यासातून आढळून आले आहे. त्यामुळे सर्वांनाच काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे.

त्या देशात येत्या काही आठवड्यांत ओमायक्रॉनचा संसर्ग आणखी वाढणार आहे. त्यात युवक रुग्णांची संख्या अधिक असेल. डेल्टापेक्षाही ओमायक्रॉनच्या संसर्गाचा प्रसार वेगाने होतो. ज्यांनी लस घेतलेली नाही अशांना व ६० वर्षे वयावरील रुग्णांना नव्या विषाणूच्या संसर्गाचा अधिक धोका आहे.

सरसकट प्रवेशबंदी नको - ओमायक्रॉन विषाणू आढळल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका तसेच आफ्रिका खंडातील अन्य काही देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी केली. मात्र, अशी सरसकट बंदी करूनही ओमायक्रॉनचा प्रसार थांबणार नाही, असा इशारा विषाणूतज्ज्ञांनी दिला होता.

प्रवेशबंदीमुळे विविध देशांच्या अर्थकारणावर परिणाम होतो. त्यामुळे सरसकट प्रवेशबंदी करू नका, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले होते. मात्र ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक आहे. तसेच या नव्या विषाणूमुळे पुन्हा कोरोना होण्याचा धोका पूर्वीपेक्षाही अधिक आहे, असे जगभरात यासंदर्भात केलेल्या अभ्यासातून आढळून आले आहे.

दक्षिण आफ्रिका तसेच सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी सांगितले की, ओमायक्रॉनमध्ये आतापर्यंत ५० परिवर्तने झाली आहेत. त्यातील ३२ परिवर्तने स्पाइक प्रोटिनमध्ये झाली आहेत. याच प्रोटिनचा उपयोग करून विषाणू माणसाच्या शरीरातील पेशीत शिरकाव करतात.

नव्या विषाणूची दहा परिवर्तने संसर्गाचा वेगाने प्रसार होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. ओमायक्रॉन प्रतिकारशक्तीचा प्रभाव खूप कमी करू शकतो हे सिद्ध करणारा अभ्यास दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी नुकताच केला. डेल्टा, बिटा या विषाणूंमध्ये प्रतिकारशक्ती क्षीण करण्याची इतकी क्षमता नव्हती.

संसर्गाची व्याप्ती वाढली - सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या प्राथमिक अभ्यासात म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या संसर्गाची व्याप्ती ही डेल्टा, बिटाच्या तुलनेत जास्त असणार आहे. ज्यांना आधी कोरोना होऊन गेला आहे, त्यांना नव्या विषाणूमुळे पुन्हा तो आजार होण्याची शक्यता वाढली आहे.

...तर नव्या लसी लागतील - मॉडर्ना या औषध कंपनीचे अध्यक्ष स्टीफन होग म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे जर लसींची परिणामकारकता ५० टक्क्यांनी कमी झाली तर आम्हाला पुन्हा प्रयोग करून नव्या लसी बनवाव्या लागतील. मॉडर्ना, फायझर अशा अनेक औषध कंपन्यांनी ओमायक्रॉन विषाणूवर लस बनविण्यासाठी याआधीच संशोधन सुरू केले आहे.