कंपनीने गर्भवतीला नोकरीवरून काढले, खटला दाखल होताच कोर्टाने असे आदेश दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:38 PM2021-05-13T23:38:58+5:302021-05-13T23:42:13+5:30

एका महिलेला कामावरून केवळ ती गर्भवती असल्याने काढून टाकण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाविरोधात ही महिला कोर्टात गेली. तिथे कोर्टाने कंपनीवर ताशेरे ओढत या महिलेला भरभक्कम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

ब्रिटनमध्ये एका महिलेला कामावरून केवळ ती गर्भवती असल्याने काढून टाकण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाविरोधात ही महिला कोर्टात गेली. तिथे कोर्टाने कंपनीवर ताशेरे ओढत या महिलेला १४ हजारा पाऊंड्स सुमारे साडे १४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ही घटना ब्रिटनमधील केंट शहरात घडली आहे.

युलिया किमिचेवा नावाची ही महिला प्रमोशन्स लिमिटेड नावाच्या एका कंपनीत मॅगझिन फिनिशर म्हणून काम करत होती. ही कंपनी पुस्तके आणि मासिकांच्या पॅकिंगचे काम करत होती. युलिया हिने कंपनीतील मॅनेजर कॅरोलिन एडवर्ड्स यांना सांगितले की, ती गर्भवती आहे आणि त्यामुळे तिला काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल.

मात्र तिला उत्तर देताना कॅरोलिना हिने सांगितले की, मी सध्या खूप बिझी आहे. तू याआधीही प्रेग्नंसीसंबंधीच्या आजारांमुळे सुट्टी घेतलेली आहेस. त्यानंतर काही दिवसांनी कॅरोलिना हिला एक ईमेल करून तिला कामावरून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगितले. तसेचा कामावरून कमी करण्यासंबंधी पाठवलेल्या पत्रात युलिया हिचे काम खूपच सर्वसामान्य असल्याचा तसेच तिची ऑफिसमधील हजेरी खूपच कमी असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच या कारणामुळे तिला कामावरून कमी करण्यात येत असल्याचे सांगितले.

या प्रकरणी कोर्टात जबाब देचाना युलिया हिने सांगितले की, गर्भवती असल्याने मला खूप त्रास सहन करावा लागत होता. त्याचा परिणाम माझ्या कामावर झाला होता. मात्र याबाबत कॅरोलिन हिने सांगितले की, आम्ही काही धर्मादाय संस्था उघडलेली नाही. आम्हाला कामगिरीच्या आधारावर कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा वा काढून टाकण्याचा अधिकार आहे.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर एम्प्लॉयमेंट जजनी सांगितले की, कॅरोलिन एडवर्ड्स हिला युलिया हिच्या गर्भावस्थेची माहिती आधीपासून होती. युलिया हिला ज्याप्रकारे कंपनीतून काढून टाकण्यात आले आणि त्यासाठी जी कारणे दिली गेली ती अयोग्य आहेत. या प्रकरणी कोर्ट कंपनीला आदेश देते की, कंपनीने या महिलेला १४ हजार पाऊंड्सची नुकसान भरपाई द्यावी.