चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:04 PM2020-09-15T16:04:04+5:302020-09-15T16:18:18+5:30

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आता चीनने अमेरिकन अंतराळ उद्योगाला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे.

गेल्या काही काळात अमेरिका आणि चीनमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. आर्थिक आणि राजकीय पातळीवर दोन्ही देशांकडून एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दोन्ही देशांत सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आता चीनने अमेरिकन अंतराळ उद्योगाला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. चीनने पाण्यावर तरंगणारा स्पेसपोर्ट विकसित केले आहे.

हा स्पेसपोर्ट म्हणजे असे जहाज आहे ज्याच्यावरून अंतराळात जाणाऱ्या रॉकेट्सचे प्रक्षेपण करता येईल. या स्पेसपोर्टचा उपयोग पॅसिफिक महासागरामधून रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी करणार आहे. त्यामुळे उपग्रहांना कमीतकमी वेळात अंतराळामध्ये पोहोचवणे शक्य होईल.

चीनच्या या तरंगत्या स्पेसपोर्टचे (Floating Spaceport) नाव ईस्ट एअरोस्पेस पोर्ट आहे. याची चाचणी आज शेडोंग प्रांतातील हैयांग या शहराजवळील समुद्रात घेण्यात आली. या स्पेसपोर्टवर छोटी रॉकेट बनवून त्यांची दुरुस्ती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे स्पेसपोर्ट चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पने विकसित केले आहे.

युनिव्हर्स टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आगामी काळात चीन आपल्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांसाठीचे प्रक्षेपण याच स्पेसपोर्टवरून करणार आहे. येथून छोटी रॉकेट, कमी वजनाची याने, उपग्रह आणि अन्य अंतराळासंबंधीच्या यंत्रांची चाचणी आणि प्रक्षेपण चीनकडून करण्यात येणार आहे. आज येथून लाँगमार्च-११ या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये ९ उपग्रह होते.

अंतराळ विज्ञानाच्या जगतामध्ये समुद्रामधून रॉकेटचे प्रक्षेपण करणे हे आजच्या घडीला सर्वात नवे तंत्रज्ञान आहे. सीएएलटीचे प्रमुख वांग जियाओजून यांनी याबाबत माहिती देताना आम्ही एक मोठे यश मिळवले आहे असे सांगितले.

यापूर्वी अमेरिकेची अंतराळ तंत्रज्ञान कंपनी असलेल्या स्पेस एक्सने आपण तरंगणाऱ्या प्रक्षेपणस्थळावरून आपल्या स्टारशिपचे प्रक्षेपण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र स्पेस एक्सचा लाँचपॅड अद्यापपर्यंत तयार झालेला नाही. अशा प्रकारच्या लाँचपॅडचा फायदा म्हणजे प्रक्षेपणावेळी होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे आसपासच्या भागातील लोकांना त्रास होत नाही,

या यशस्वी प्रक्षेपणानंतर चीनने या वर्षाच्या अखेरीपर्यंत अजून पाच उपग्रह या प्रक्षेपणस्थळावरून पाठवण्याची योजना आखली आहे. यापूर्वी चीनने भूपृष्टावरील लॉन्चपॅडवरून अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

गेल्याच आठवड्यामध्ये चीनच्या अंतराळ प्रकल्पाला एक मोठा धक्का बसला होता. चीनच्या एका रॉकेटचा बुस्टर रॉकेटपासून वेगळा होऊन एका भागात पडला होता. त्यानंतर त्याचा स्फोट झाला होता हा बुस्टर फुटला त्याच्यापासून जवळच एक शाळा होती. यामध्ये कुणी जखमी झाले असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.