गुडन्यूज : कोरोनाचा 'आकार' बदलतोय, शास्त्रज्ञांना होईल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:34 PM2020-08-11T13:34:27+5:302020-08-11T13:41:54+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाचा धोका वाढला असून आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात सात लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याला यश देखील आले आहे. विविध चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाचा उद्रेक होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे.

जगभरात तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोना आपल्यात आकारात बदल करत असल्याचं दिसून आलंय. संक्रमणानंतर स्पाईक प्रोटीन रॉडसारखा आकार कोरोना घेत आहे. कोरोनाबाबतची ही नवी माहिती कोरोनाचा नायनाट करण्यासाठी उपयोगी पडू शकते.

सायन्स जनरलमध्ये प्रकाशित एका शोध निबंधानुसार संक्रमणानंतर कोरोनाचा आकार बदलत आहे. त्यामुळे, संक्रमित व्यक्तीच्या शरिरात स्पाईक प्रोटीन पोहोचल्यानंतर लांब रॉडसारखा आकार हा व्हायरस घेत आहे.

अमेरिकेतील बोस्टन चिड्रन्स हॉस्पीटलने आपल्या संशोधनात हा दावा केला आहे. व्हायरससंदर्भातील ही नवीन माहिती, व्हायरसच्या लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना फायदेशीर ठरू शकते.

कोरोना व्हायरसच्या बाहेरील बाजूस मुकूटप्रमाणे दिसणारा भाग आहे, जेथून व्हायरस प्रोटीनला बाहेर काढतो. यास स्पाईक प्रोटीन असे म्हणतात. या प्रोटीनमुळेच संक्रमणाची सुरुवात होते.

संशोधनकर्ता डॉ. बिंग चेन आणि त्यांच्या टीमने क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपीच्या सहाय्याने वायरसचा आकार पाहिला. त्यामध्ये व्हायरसचा स्पाईक प्रोटीन आकार बदलत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 45,257 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.