ब्रिटन ऑगस्टपर्यंत कोरोनामुक्त होणार, वॅक्सिन टास्कफोर्स प्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 04:24 PM2021-05-08T16:24:59+5:302021-05-08T16:40:29+5:30

britain : ऑगस्टपर्यंत ब्रिटनमध्ये कोणत्याही नवीन संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. यातच कोरोनासंबंधी एक दिलासादायक बातमी ब्रिटनमधून येत आहे. ऑगस्टपर्यंत ब्रिटनमध्ये कोणत्याही नवीन संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

सध्या ब्रिटिश सरकार (British Government)कोरोना लसीच्या (Covid-19 Vaccine)बूस्टर शॉटच्या शोधात आहे. देशात कोरोनाचा B.1.1.67 व्हेरिएंटचा जास्त प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात येते.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या लस टास्कफोर्सचे प्रमुख क्लीव्ह डिक्स यांनी असा दावा केला आहे की, ऑगस्टपर्यंत ब्रिटनमध्ये नवीन कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल.

शुक्रवारी द टेलीग्राफसोबत झालेल्या चर्चेवेळी ते म्हणाले, 'ऑगस्टमध्ये आम्हाला ब्रिटनमध्ये कोणताही व्हायरसचा प्रादुर्भाव होताना दिसणार नाही.' तसेच, लसीचा बूस्टर प्रोग्रॉम 2022 च्या सुरूवातीसाठी टाळता येऊ शकतो, यासंबंधीही माहिती त्यांनी दिली आहे.

जुलैच्या अखेरीस ब्रिटनमधील सर्व लोकांना किमान एकदाच ही लस लागण्याची शक्यता क्लीव्ह डिक्स यांनी व्यक्त केली आहे. तसेच, तोपर्यंत सर्व ज्ञात व्हेरिएंट्सपासून लोकांना सुरक्षित करू, असेही क्लीव्ह डिक्स यांनी म्हटले आहे.

विशेष बाब म्हणजे लसीचा पहिला डोस वापरण्यात ब्रिटन हा दुसरा वेगवान देश आहे. आतापर्यंत येथे 5 कोटींहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्या आहेत.

वर्ल्डोमीटर आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 44 लाख 31 हजार 43 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1 लाख 27 हजार 598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आतापर्यंत 42 लाख 42 हजार 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत जगात कोरोनाचे एकूण 15 कोटी 75 लाख 51 हजार 742 रुग्ण आढळले आहेत. अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांत कोरोनामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे.

याचबरोबर, भारतात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत.