घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:29 IST2025-09-06T11:25:13+5:302025-09-06T11:29:38+5:30

ब्राझीलच्या क्यूरिटिबा शहरात एक अशी फॅक्टरी आहे, ज्याच्याबद्दल ऐकून पहिल्यांदा कुणालाही विश्वास बसणार नाही. ही फॅक्टरी मच्छर बनवते. यात कोट्यवधीच्या संख्येने मच्छर उत्पादन केले जाते.
या फॅक्टरीत दर आठवड्याला जवळपास १० कोटी मच्छरांची अंडी तयार केली जातात. त्यांना अत्यंत नाजूकपणे सांभाळले जाते. हे मच्छर जास्तीत जास्त अंडी द्यावी त्यासाठी त्यांना घोड्यांचे रक्तही पाजले जाते.
या फॅक्टरीत या डासांवर खूप चांगले उपचार केले जातात कारण ते डेंग्यू आणि झिकाशी लढण्यासाठी शस्त्र म्हणून वापरता येतील. खरंतर, या डासांमध्ये वॉल्बॅकिया नावाचा एक बॅक्टेरिया टाकला जातो.
हा बॅक्टेरिया डासांची रोग पसरवण्याची क्षमता कमी करतो. जेव्हा फॅक्टरीत तयार केलेले डास बाहेर सोडले जातात तेव्हा ते इतर डासांमध्येही तोच विषाणू पसरवतात
वॉल्बॅकिया हा बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या अनेक कीटकांमध्ये आढळतो, परंतु एडिस इजिप्ती डासांमध्ये तो नैसर्गिकरित्या नसतो. या डासांना वॉल्बॅकिया बॅक्टेरियाने संसर्गित केले जाते, ज्यामुळे डासांद्वारे विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते.
ब्राझीलमध्ये २०२४ मध्ये डेंग्यूच्या ६५ लाख प्रकरणांची नोंद झाली होती, त्यामुळे ही पद्धत रोग नियंत्रणासाठी महत्त्वाची मानली जाते. या फॅक्टरीमुळे दरवर्षी १.४ कोटी लोकांचे संरक्षण होण्याचा दावा करण्यात येतो.
या डासांना प्रेमाने 'व्होल्बिटोस' असे नाव दिले गेले आहे. हा प्रयोग कोलंबिया, इंडोनेशिया आणि ब्राझीलमधील नितेरोई येथेही करण्यात आला आहे. या शहरांमध्ये डासांच्या प्रजननाचा परिणाम चांगला दिसला. प्रयोगात समाविष्ट असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या घटनांमध्ये ६९% पर्यंत घट झाली.
ही मच्छरांची फॅक्टरी चालवणे इतके सोपे नाही. डासांना प्रजननासाठी योग्य तापमान, वातावरण आणि रक्ताची आवश्यकता असते. तसेच आजूबाजूच्या लोकांना हे मच्छर चावणारे नाहीत, वाचवणारे आहेत हे समजावून सांगावे लागते. म्हणजेच त्यांना त्यांच्यापासून कोणताही धोका नाही.
ब्राझीलमधील क्युरिटिबा येथील या अनोख्या फॅक्टरीत लाखो डासांची पैदास होत आहे कारण मच्छरांपासून पसरणाऱ्या आजारांना तोंड देता यावे. येथे जन्मलेले डास डेंग्यू, झिका आणि चिकनगुनियासारखे संसर्ग पसरवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, फॅक्टरीत विषाणूंशी लढणाऱ्या डासांची फौज तयार केली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), डेंग्यू हा एक प्रमुख रोग आहे. दरवर्षी अंदाजे ३९ कोटी लोकांना डेंग्यूचा संसर्ग होतो, त्यापैकी सुमारे २.५ कोटी प्रकरणे गंभीर स्वरूपाची असतात. डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे सरासरी ४०,००० मृत्यू होतात.