George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:23 PM2020-06-01T17:23:01+5:302020-06-01T17:44:44+5:30

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयर्ड यांच्या मृत्यूनंतर सलग सहाव्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. राजधानी वॉशिंग्टनसह अमेरिकेतील तब्बल 40हून अधिक शहरांमध्ये दंगेखोरांवर नियंत्रण मिळवण्यसाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. सांगण्यात येते, की अमेरिकेच्या इतिहासात 52 वर्षातील हा सर्वात मोठा हिंसाचार आहे. तसेच वांशिक अशांततेची घटना आहे. यापूर्वी 1968मध्ये मार्टिन लुथर किंग यांची हत्या झाल्यानतंर अशाच प्रकारचा हिंसाचार अमेरिकेत उफाळून आला होता.

व्हाइट हाऊसजवळ निदर्शन, पोलिसांशीही चकमक - व्हाइट हाऊसजवळ तिसऱ्या दिवशी निदर्शन हिंसक झाल्यानतंर पोलिसांनी अश्रू गॅसचे गोळे फेकले आणि जमाव पांगवला. यावेळी जमावात आणि पोलिसांत चकमक उडाली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आधिकृत निवास स्थानाजवळ पोलीस आणि सिक्रेट सर्व्हिसच्या सहकार्यासाठी यूएस नॅशनल गार्ड्सदेखील तैनात करण्यात आले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन डीसीमध्ये पोलीसांनी व्हाइट हाऊसजवळ नासधूस करणाऱ्या निदर्शकांमध्ये अश्रू गॅसचे गोळे फेकले.

सोमवारीही अनेक शहरांत हिंसाचार - न्यूयॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया आणि लॉस एन्जल्स येथे सोमवारीही निदर्शकांसोबत पोलिसांची चकमक झाली. निदर्शकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. तसेच अनेक दुकानांचेही नुकसान केले. स्थानिक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने अनेक शहरांत अमेरिकेच्या रिझर्व्ह फोर्स नॅशनल गार्ड्सना तैनात करण्यात आले आहे.

अमेरिकेतील 75हून अधिक शहरांत निदर्शने - अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. जी शहरं कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे पूर्णपणे बंद होते आणि रस्ते ओस पडले होते. तेथे आता संतप्त जमाव रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहे.

येथे सर्वाधिक प्रभाव - फिलाडेल्फियामध्ये दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि त्या जाळून टाकल्या. एवढेच नाही, तर त्यांनी अनेक दुकानेही लुटले. कॅलिफोर्नियाच्या सांता मोनिका येथेही दंगेखोरांनी लूट केल्याचे समजते. अॅटलांटा आणि जॉर्जिया येथे जमावावर अश्रू गॅस आणि लाठीचार्ज केल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ह्यूस्टन येथेही लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.

आतापर्यंत 4,100 जणांना अटक - अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. यांपैकी अधिकांश दंगेखोरांना तात्पुरत्या कारागृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. जागोजागी नॅशनल गार्डचे जवान गस्त घालत आहेत.

निदर्शनांच्या आडून लुटालूट - हिंसक निदर्शनांदरम्यान अनेकांनी संधीसाधत लुटालूटही केली. अनेक महागड्या दुकानांमधून ज्याला जे मिळाले, तो ते घेऊन पळाला. पोलिसांनी अनेक शहरांत फ्लॅगमार्चदेखील काढले.

हिंसाचारासाठी ट्रम्प यांनी डाव्यांना धरले जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असेलेल्या हिंसाचारासाठी देशातील डाव्यांना जबाबदार धरले आहे. दंगेखोर निर्दोष लोकांना घाबरवत आहेत. धंद्यांचे नुकसान करत आहेत आणि इमारती जाळत आहेत.

ट्रम्प म्हणाले, जॉर्ज फ्लॉयडच्या आठवणीला दंगेखोर, लुटारू आणि अशांतता पसरवणाऱ्यांनी बदनाम केले आहे. ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, की नॅशनल गार्ड्सना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. जे डेमोक्रॅटिक पक्षाच्या महापौरांना करता आले नाही. दोन दिवसांपूर्वीच यांचा वापर करण्यात यायला हवा होता. आता आणखी नुकसान होणार नाही.

Read in English