लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:38 IST2025-10-14T17:32:51+5:302025-10-14T17:38:41+5:30
Madagascar News: गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये जेन-Z ने केलेल्या प्रखर आंदोलनांमुळे सत्तांतर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात भारताशेजारील नेपाळमध्येही अशीच राजकीय उलथापालथ झाली होती. त्यानंतर आता हिंदी महासागरात असलेल्या मादागास्कर या देशात लष्कराने उठाव केल्यानंतर राष्ट्रपती एंड्री राजोइलिना यांनी देश सोडला आहे. तसेच अज्ञात ठिकाणाहून त्यांनी देशवासियांना संबोधित केले.

गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये जेन-Z ने केलेल्या प्रखर आंदोलनांमुळे सत्तांतर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात भारताशेजारील नेपाळमध्येही अशीच राजकीय उलथापालथ झाली होती. त्यानंतर आता हिंदी महासागरात असलेल्या मादागास्कर या देशात लष्कराने उठाव केल्यानंतर राष्ट्रपती एंड्री राजोइलिना यांनी देश सोडला आहे. तसेच अज्ञात ठिकाणाहून त्यांनी देशवासियांना संबोधित केले.
मादागास्करचे राष्ट्रपती एंड्री राजोइलिना यांनी अज्ञात ठिकाणाहून देशवासियांना संबोधित सांगितले की, लष्करी उठावानंतर माझ्या जीवितास धोका होता. त्यामुळे मी देश सोडून गेलो आहे. मात्र राजोइलिना यांनी भाषणामधून राजीनाम्याची घोषणा केलेली नाही.
मादागास्करमध्ये पाणी आणि आणि विजेच्या सातत्याने होत असलेल्या कपातीविरोधात २५ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनात जेन-झेड आघाडीवर आहे. दरम्यान शनिवारी लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्याने परिस्थिती चिघळली. लष्कराच्या या तुकडीने राष्ट्रपती तसेच मंत्र्यांनी पद सोडावे, अशी मागणी केली, तसेच आंदोलकांवर गोळीबार करण्यास लष्कराने नकार दिला.
देशात अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्रपती राजोइलिना यांनी मदागास्कारमध्ये सत्ता बळकावण्याचे बेकायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच मला आपले प्राण वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधणे भाग पडले असे सांगितले.
लष्करी शाखा असलेल्या कॅपसेटने सत्तांतर घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न आणि राजधानी अंतानानारियो येथील मुख्य चौकात हजारो आंदोलकांसोबत आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रपती राजोइलिना यांनी पहिल्यांदाच या आंदोलनाबाबत जाहीरपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती राजोइलिना यांनी या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी चर्चेचं आवाहन केलं आहे. तसेच संविधानाचा सन्मान केला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मात्र आपण मादागास्करमधून कसे बाहेर पडलो, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. एका रिपोर्टनुसार मादागास्करच्या राष्ट्रपतींना फ्रान्सच्या एका लष्करी विमानामधून देशाबाहेर आणण्यात आले. मात्र फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्याने या संदर्भात कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला.
मादागास्कर हा देश फ्रान्सची वसाहत राहिलेला आहे. तसेच राजोइलिना यांच्याकडे कथितपणे फ्रान्सचं नागरिकत्व असल्याचा दावा केला जातो. त्याबाबत देशातून अनेकदा नाराजीही व्यक्त झाली होती.