बर्ड फ्लूचं संकट राज्याच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या माणसांसाठी किती धोकादायक

By कुणाल गवाणकर | Published: January 5, 2021 05:39 PM2021-01-05T17:39:02+5:302021-01-05T17:42:35+5:30

देशासमोरचं कोरोना संकट कायम असताना आता बर्ड फ्लूनं सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातलं आहे.

राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये बर्ड फ्लू शेकडो पक्ष्यांच्या जीवावर बेतला आहे. हे संकट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानं सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.

बर्ड फ्लूचे विषाणू अतिशय धोकादायक असतात. त्यांच्यापासून माणसालाही धोका पोहोचू शकतो.

सध्याच्या घडीला देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. पक्ष्यांमध्ये H5N1 आणि H5N1 विषाणू आढळून आले आहेत. काही भागांत कावळ्यांमध्ये H5N8 विषाणू सापडला आहे. सामान्यपणे हा विषाणू पक्षांमध्येच सापडतो.

प्रवासी पक्षांमुळे बर्ड फ्लूचे विषाणू वेगाने पसरतात. सध्या देशात मोठ्या संख्येनं प्रवासी पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूचे विषाणू पसरण्याचा धोका वाढला आहे.

H5N1 पासून H5N5 बर्ड फ्लू धोकादायक मानले जातात. ते वेगानं पसरतात. मात्र H5N8 एवियन इन्फ्लुएंजानं केवळ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. H5N1 विषाणू अतिशय धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

H5N1 च्या विषाणूनं माणसाच्या शरीरात प्रवेश केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र तो माणसातून माणसात पसरलेला नाही. मात्र हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. या विषाणूची लागण झालेले ६० टक्के जण जीवाला मुकतात.

H5NI विषाणूची लागण माणसांना झाल्यास धोकादायक ठरू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. विषाणूची बाधा झाल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. याशिवाय जीव जाण्याचा धोका असतो.

H5NI चा विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. सर्दी, ताप, श्वास घेण्यात अडचणी आणि वारंवार उलट्या होणं ही H5NI लक्षणं आहेत. याशिवाय अतिसार आणि छातीत दुखण्याचीही समस्या भेडसावते.

पूर्वी पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाच बर्ड फ्लूचा धोका होता. पण २०१३ मध्ये चीनमध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली. वडिलांकडून बर्ड फ्लूची लागण झाल्यानं ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.