नव्या संकटाची चाहूल; १०० वर्षांपूर्वी ५ कोटी जीव घेणाऱ्या 'त्या' आजाराची साथ पुन्हा येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 09:05 AM2021-03-04T09:05:36+5:302021-03-04T11:40:18+5:30

Spanish flu might return WHO warns: स्पॅनिश फ्लूची साथ पुन्हा येईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. तसं झाल्यास कोरोनानंतर जगाला आणखी एका संकटाचा सामना करावा लागेल

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाचं संकट संपलेलं नाही. देशात अनेक ठिकाणी कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. त्यामुळे संबंधित भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्या देशांचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. भारतातही लसीकरण सुरू झालं आहे. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी कोरोनाचे २ हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा १० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनाचं संकट आणि त्याविरुद्धचा लढा सुरू असताना आणखी एक नवं संकट जगावर येऊ शकतं, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

१०० वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घातलेला स्पॅनिश फ्लू पुन्हा येऊ शकतो, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे. स्पॅनिश फ्लूमुळे ५ कोटी लोकांचा जीव गेला होता.

स्पॅनिश फ्लू पुढील महामारीचं कारण ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ब्रिटिश वर्तमानपत्र द सननं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

स्पॅनिश फ्लूचं रुपांतर विषाणूमध्ये झाल्यास हाहाकार उडेल. कारण यामुळे तो अधिक घातक होईल, अशी माहिती डब्ल्यूएचओचे 'ग्लोबल इंफ्लुएंजा सर्व्हिलान्स एँड रिस्पॉन्स सिस्टम'चे वरिष्ठ सदस्य असलेल्या डॉ. जॉन मॅककॉली यांनी दिली.

सध्याच्या घडीला संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पुढील संकट कोणत्या विषाणूमुळे येऊ शकतं यावर संशोधन सुरू आहे.

साधा फ्लूदेखील भविष्यात डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती डॉ. जॉन मॅककॉली यांनी व्यक्त केली. फ्लूच्या स्ट्रेनमुळे भविष्यात महामारी येऊ शकते, असं ते म्हणाले.

कोरोना संकटानंतर जगासमोर हंगामी विषाणूंचा धोका असेल. त्यावेळी हे विषाणू अधिक धोकादायक स्वरूप धारण करतील, असा धोक्याचा इशारा डॉ. जॉन मॅककॉली यांनी दिला.

१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या संकटात जगाची एक तृतीयांश लोकसंख्या सापडली होती. पक्ष्यांमुळे या फ्लूची सुरुवात झाली. यामुळे ५ कोटी लोकांचा जीव गेला होता.