Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोट्यवधी लोकांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:55 PM2021-07-27T17:55:55+5:302021-07-27T17:59:42+5:30

Corona Vaccination: देशात कोविशील्डचा सर्वाधिक वापर होत असताना संशोधनातून समोर आली चिंताजनक माहिती

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

कोरोना लसीकरण अभियानात दोन लसींचा सर्वाधिक वापर होत आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा वापर प्रामुख्यानं होत आहे. सीरमची उत्पादन क्षमता जास्त असल्यानं अनेकांना कोविशील्ड लस मिळाली आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालामुळे कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंता वाढली आहे. फायझर आणि ऍस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्यांच्या अँटिबॉडीजचं प्रमाण ६ आठवड्यांनंतर कमी कमी होत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.

ऍस्ट्राझेनेकाची लस देशात कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे. या लसीबद्दल युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (यूसीएल) संशोधकांनी अभ्यास केला. ऍस्ट्राझेनेका आणि फायझरच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडी १० आठवड्यांनंतर ५० टक्क्यांच्या खाली येत असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

ऍस्ट्राझेनेका आणि फायझरची लस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीज याच वेगानं कमी होत राहिल्यास कोरोना विषाणूपासून मिळणारं संरक्षण कमी होईल, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली.

फायझरचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीजचं प्रमाण कोविशील्ड लसीचे दोन घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीजपेक्षा अधिक आहे, असं संशोधनातून आढळून आलं आहे.

ऍस्टाझेनेका आणि फायझरचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरातील अँटिबॉडीजचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळेच तेव्हा शरीराचं कोरोना विषाणूपासून रक्षण होतं, अशी माहिती यूसीएल इन्स्टिट्यूटच्या मधुमिता श्रोत्री यांनी दिली.

फायझर आणि ऍस्ट्राझेनेका लसीचे दोन्ही डोस झाल्यावर दोन ते तीन महिन्यांत अँटिबॉडीजचं प्रमाण वेगानं घसरतं, असं श्रोती यांनी सांगितलं.

अठरा वर्षांवरील ६०० हून अधिक जणांवर करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश होता.

Read in English