भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

By manali.bagul | Published: September 21, 2020 11:18 AM2020-09-21T11:18:35+5:302020-09-21T11:52:50+5:30

जगभरात कोरोनाच्या माहामारीमुळे करोडो लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये नवीन एका आजाराने हाहाकार निर्माण केला आहे. हा आजार बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे पसरला आहे.

गांसु प्रांतांची राजधानी लान्चो येथील आरोग्य आयोगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारानं आतापर्यंत ३ हजार २४५ लोकांना संक्रमित केलं असून ब्रुसेलोसिस हे या आजाराचं नाव आहे. चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार प्राण्यांपासून पसरतो. १ हजारापेक्षा जास्त लोकांमध्ये या आजाराचं संक्रमण झालेलं दिसून आलं आहे.

लांझोऊ प्रांतात ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी २९ लाख लोकांपैकी २१ हजार ८४७ लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

प्राण्यांतून ब्रुसेला हा विषाणू माणसात संक्रमित होऊन हा आजार होतो. त्यामुळे पुरुषांच्या अंडकोषांना सूज येण्याची शक्यता असते. तसेच हा आजार जडलेल्यांपैकी काही जणांची जननक्षमता नष्ट होण्याचा धोका संभवतो.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आजाराला Malta fever किंवा Mediterranean fever या नावानं ओळखलं जातं.

या आजारात डोकेदुखी, मासपेशींतील वेदना, ताप येणं, थकवा येणं ही लक्षणं दिसून येतात.

चीनने ब्रुसेलोसिसने आजारी असलेल्यांच्या तपासणीसाठी लांझोऊ प्रांतात मोठी मोहीम उघडली आहे. ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

या आजारामुळे सुदैवाने एकही बळी गेलेला नाही. या आजाराचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.