CoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:25 PM2021-07-22T21:25:16+5:302021-07-22T21:28:11+5:30

CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांना नवा धोका; काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ५० हजारांहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न होत असताना कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्यांना बरेच दिवस अशक्तपणा जाणवतो. काही जणांना ब्लॅक, व्हाईट फंगसची लागण झाली. काहींचा मेंदू आक्रसल्याच्या घटना समोर आल्या. यानंतर आता कोरोनामुक्त झालेल्यांपुढे नवं संकट निर्माण झालं आहे.

आता कोरोनामुक्त झालेल्यांच्या यकृतांना गंभीर स्वरुपाची इजा होत असल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीतल्या एका मोठ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांना यकृताशी संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत.

१४ रुग्णांपैकी एकाच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. १४ पैकी ८ जणांना कोरोनावरील उपचारादरम्यान स्टेरॉईड्स देण्यात आले होते.

कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या १४ रुग्णांना होणारा त्रास एकसारखाच आहे. त्यांच्या यकृताचा आकार वाढला आहे. याशिवाय त्या भागाला फोड आले आहेत.

एंटअमीबा हिस्टोलिटिका नावाच्या परजिवीमुळे यकृताला फोड येतात. दूषित जेवण आणि पाण्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १० पुरुष आणि ४ महिलांचा समावेश असून ते २८ ते ७४ वर्ष वयोगटातील असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

गेल्या २ महिन्यांत कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांच्या यकृताला फोड आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्यांच्या बाबतीत असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

खराब पोषण आणि स्टेरॉईड्समुळे यकृताजवळ फोड येऊन त्यात पू तयार झाला असून तो यकृतासाठी नुकसानकारक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आतापर्यंत १४ जणांना अशा प्रकारचा त्रास झाला असून त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read in English