CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह आहात? बेड मिळत नाही?; घरीच 'असे' उपचार घ्या अन् निगेटिव्ह व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:42 PM2021-04-20T12:42:05+5:302021-04-20T12:47:15+5:30

how to deal with corona at home: घरच्या घरी राहून कशी कराल कोरोनावर मात? जाणून घ्या लाखमोलाच्या टिप्स

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधील परिस्थितीदेखील गंभीर होत चालली आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यानं अनेक रुग्णालयांची क्षमता संपली आहे. अनेक कोरोना रुग्णांना सध्या रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीएत. अनेक कोविड सेंटर्सवरदेखीत अतिशय ताण आहे.

एखाद्या कोरोना रुग्णाला बेड मिळत नसल्यास त्यानं घरीच राहून स्वत:वर उपचार करावेत. सौम्य लक्षणं असणारे रुग्ण घरीच उपचार करून बरे होऊ शकतात, अशी माहिती दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाचे सल्लागार डॉ. वेद चतुर्वेदी यांनी दिली.

कोरोना झालेल्या रुग्णांनी ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासत राहावी. ती ९४ च्या खाली असल्यास पोटावर झोपावं. दिवसातून तीनदा प्रत्येकवेळी दोन तास अशा पद्धतीनं झोपावं.

पोटावर झोपूनदेखील शरीरातील ऑक्सिजन पातळी न वाढल्यास घरी ऑक्सिजन सिलिंडर किंवा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर मागवावा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास सीटी स्कॅन करावा.

कोरोनातून बरं होण्यासाठी औषधं महत्त्वाची आहेत. त्यासाठी स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधा. अनेक डॉक्टर सध्या मोबाईलवरून रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांची मदत घ्यावी. रुग्णालयात मिळणारी औषधं आयव्ही मार्फत दिली जातात. तीच औषधं गोळ्यांच्या स्वरुपातही घेता येऊ शकतात.

कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन घेण्याची आवश्यकता नसते, असं आकाश हेल्थकेअरचे सल्लागार डॉ. विक्रमजीत सिंग यांनी सांगितलं. सौम्य, मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांनी योग्य उपचार घेतल्यास ते घरीच बरे होऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना रुग्णानं घरी मास्क घालावा. त्याच्या घरातील इतर व्यक्तींनीदेखील मास्क परिधान करावा. घराच्या खिडक्या हवा खेळती राहण्यासाठी उघड्या ठेवाव्या.

कोरोना रुग्णानं स्वत:जवळ एक ऑक्सिमीटर ठेवावा आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी सातत्यानं तपासावी. ताप आल्यास पॅरासिटीमॉल घ्यावी. भरपूर पाणी प्यावं.

ब्युडेसोनाईडचा वापर करूनदेखील आराम मिळतो. लक्षणं जाईपर्यंत दिवसातून दोनदा ब्युडेसोनाईडनं दोनदा श्वास घ्यावा.

शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण ८५ टक्क्यांच्या खाली गेल्यास लगेच हॉस्पिटलशी संपर्क साधावा. ऑक्सिजनची पातळी ८५ च्या खाली गेल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.