Corona Vaccination: गुड न्यूज! Covishield घ्या किंवा Covaxin दोन्हीही लस उत्तम, पण सर्वात प्रभावी...; नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:39 AM2021-06-07T07:39:30+5:302021-06-07T07:56:29+5:30

Corona Vaccination: देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्यापासून लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र नेमकी कोणती लस घ्यायची याबाबत लोकांच्या मनात द्विधा अवस्था आहे.

कोरोना व्हायरसविरोधात कोणती लस सर्वात प्रभावी ठरत आहे? कोणती लस घेतल्यानंतर कोरोना संक्रमणाचा धोका संपू शकतो? कोणत्या लसीचे साइड इफेक्ट सर्वात कमी आहेत? कोणती लस घेतल्यानंतर शरीरात अँन्टिबॉडी वेगाने तयार होऊ शकतात? असे विविध प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात कोरोना लस घेण्यापूर्वी निर्माण होत आहेत.

अशावेळी कोरोना लसीवर इंड्यूस्ड अँन्टिबॉडी ट्राइटे(COVAT) कडून केलेल्या स्टडीचा रिपोर्ट समोर आला आहे. यात रिपोर्टनुसार कोव्हॅक्सिन(Covaxin) च्या तुलनेत कोविशील्ड(Covishield) ही ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाने बनवलेली लसीमुळे सर्वाधिक अँन्टिबॉडीज बनतात हा खुलासा केला आहे.

या रिपोर्टच्या अनुसार, लसीचा पहिला डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशील्ड लस घेणाऱ्या लोकांमध्ये अँन्टिबॉडी अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. हा रिसर्च करण्यासाठी ५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलं होतं.

स्टडीमध्ये दावा केलाय की, कोविशील्ड लस घेणाऱ्यांमध्ये सीरोपॉझिटिव्हीटी रेट ते एन्टी स्पाइक अँन्टिबॉडी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात आहे.

परंतु इतकचं नाही तर स्टडीत असंही म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसच्या दोन्ही लसी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन शरीरात अँन्टिबॉडी निर्माण करण्यासाठी चांगला प्रतिसाद देतात. परंतु सीरोपॉझिटिव्हीटी रेट आणि एंटी स्पाइक अँन्टिबॉडीज कोविशील्डमध्ये अधिक आहेत.

सर्व्हेत सहभागी असणाऱ्या ४५६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशील्ड आणि ९६ कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला होता. पहिल्या डोसनंतर ओवरऑल सीरोपॉझिटिव्हीटी रेट ७९.३ टक्के इतका होता. या स्टडीच्या निष्कर्षात असंही म्हटलं आहे की, दोन्ही पैकी कोणतीही एक लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत आहेत.

COVAT च्या सुरू असलेल्या स्टडीमध्ये दोन्ही लसीच्या दुसऱ्या डोसनंतर इम्यून रिस्पॉन्सच्या बाबतीत आणखी चांगले निष्कर्ष मिळू शकतात. या स्टडीत समाविष्ट केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींपैकी कोणतीही लस देण्यात आली होती.

त्याचसोबत यात काही असेही होते ज्यांना Sars Cov 2 संक्रमणाची लागण झाली होती. तर काही जण असे होते ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नव्हती. अँन्टिबॉडी म्हणजे शरीरातील अशी रोगप्रतिकार शक्ती असते जी वायरसचा प्रार्दुभाव कमी करून त्यांच्याशी लढण्याची ताकद शरीराला देत असते.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर शरीरात अँन्टिबॉडीज तयार होण्यासाठी बऱ्याचदा एक आठवड्यांच्यापेक्षाही अधिकचा कालावधी जातो. जेव्हा कोणी कोरोना संक्रमित होत असेल तर त्याच्या शरीरात अँन्टिबॉडी तयार होते. ती वायरसशी लढण्यासाठी मदत करते.

बरे झालेल्या १०० कोरोना रुग्णांपैकी ७०-८० रुग्णांमध्ये अँन्टिबॉडीज बनल्या आहेत. आजारातून बरे झाल्यानंतर २ आठवड्याच्या आत अँन्टिबॉडी तयार होतात. तर काही रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक महिने अँन्टिबॉडी बनत नाहीत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English