HIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप

By बाळकृष्ण परब | Published: October 1, 2020 01:16 PM2020-10-01T13:16:32+5:302020-10-01T13:24:22+5:30

तिमोथी ब्राऊन यांनी ल्युकेमिया आणि एचआयव्हीच्या इलाजादरम्यान, २००७ मध्ये अस्थिमज्जा आणि स्टेम सेलचे प्रत्यारोपण केले होते. त्यामुळे त्यांचा ल्युकेमिया आणि एचआयव्हीच आजार बरा झाला होता.

एचआयव्हीच्या संसर्गातून मुक्त झालेली जगातील पहिली व्यक्ती ठरलेल्या तिमोथी रे ब्राऊन यांचा मृत्यू झाला. वयाच्या ५४ व्या वर्षी कर्करोगामुळे तिमोथी यांचा मृत्यू झाला. द बर्लिन पेशंट म्हणून ब्राऊन यांना ओळखले जात असे. ब्राऊनचा सहकारी टिम हॉफगेन याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितले की, पाच महिन्यांपर्यंत कर्करोनाशी झुंज दिल्यानंतर ब्राऊन यांचा मृत्यू झाला आहे.

तिमोथी ब्राऊन यांनी ल्युकेमिया आणि एचआयव्हीच्या इलाजादरम्यान, २००७ मध्ये अस्थिमज्जा आणि स्टेम सेलचे प्रत्यारोपण केले होते. त्यामुळे त्यांचा ल्युकेमिया आणि एचआयव्हीच आजार बरा झाला होता. मात्र नंतर ते पुन्हा एकदा कर्करोगग्रस्त झाले होते. या व्यक्तीने एचआयव्हीवर इलाज करणारे डॉक्टर आणि एचआयव्हीच्या रुग्णांना प्रभावित केले होते. तसेच एचआयव्हीचा इलाज शक्य असल्याची आशा त्यांच्या मनात जागवली होती.  

इंटरनॅशनल एड्स सोसायटीचे अध्यक्ष अदीबा क्मरुलजमेन यांनी सांगितले की, आम्ही तिमोथी आणि त्यांचे डॉक्टर गेरो हेटर यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच तज्ज्ञांना एक मार्ग मिळाला, ज्यामधून एचआयव्हीचा इलाज शक्य असल्याची आशा निर्माण झाली. १९९५ मध्ये जेव्हा ब्राऊन हे बर्लिनमध्ये राहत होते. तेव्हा त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. मात्र ब्राऊन हे एक वर्षापैक्षा अधिक काळ एचआयव्हीवर उपचार केल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते.

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टराने सांगितले की, रक्ताचा कर्करोग त्यांच्या मणक्यात आणि मेंदूमध्ये पसरला होता. ब्राऊन सध्या आपल्या घरी पाम स्प्रिंग्स, कॅलिफोर्निया येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. ब्राऊन यांचे सहकारी हॉफगेन यांनी सांगितले की, टिम जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती होता. ब्राऊनने आपल्यावरील इलाजाची कहाणी कथन करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. एचआयव्ही रुग्णांसाठी तो आशेचा किरण बनला होता. त्यांच्यावर इलाज करणारे जर्मन डॉक्टर गेरो हेटर यांनी सांगितले की, ब्राऊन यांच्यावर उपचार करणे हे अंधारात बाण मारण्यासारखे होते.

उपचारादरम्यान, ब्राऊन यांच्या इम्युन सिस्टिमला नष्ट करणे आणि सीसीआर५ नामक जीन उत्परिवर्तनासह स्टेम पेशींमध्ये प्रत्यारोपण करणे सामील होते. हे जीन एचआयव्हीला प्रतिबंध करते. लोकांचा एक छोटाचा समूह ज्यामध्ये बहुतांश मुळचे उत्तर युरोपीय आहेत. त्यांच्यामध्ये सीसीआर५ चे म्युटेशन दिसून येते. ते एड्सला तयार करणाऱ्या विषाणूसाठी प्रतिबंधक बनवतात. या आणि अन्य घटकांनी उपचाराला महाग, क्लिष्ट आणि धोकादायक बनवले आहे.

बहुतांश तज्ज्ञ सांगतात की, हा सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठीची एक पद्धत बनू शकत नाही, कारण यापैकी अनेक प्रक्रियांमधून मृत्यूची जोखीम ही अधिक असते. एचआयव्हीची सुरुवात १९८० मध्ये झाली होती. सध्या जगभरात तीन कोटी ७० लाख एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. तर आतापर्यंत या आजाराने साडे तीन कोटी लोकांचा बळी घेतला आहे.

गेल्या तीन दशकांमध्ये उपचार पद्धतीत झालेल्या प्रगतीने अँटीरेट्रोव्हायरल थेरेपीच्या रूपात केल्या जाणाऱ्या औषधांना विकसित करण्यासाठी प्रेरित केले आहे ही पद्धती विषाणूला रोखून धरण्यास सक्षम आहे. त्यामुळे संसर्ग झालेली व्यक्ती अनेक वर्षे विषाणूसह जगू शकते. अॅडम कॅस्टिलजो हे यावर्षी आपली ओळख होईपर्यंत लंडन रुग्णाच्या नावाने ओळखले जात होते. ते २०१६ मध्ये ब्राऊन यांच्या प्रमाणे ट्रान्सप्लांट झाल्याने एचआयव्ही मुक्त झाल्याचे मानण्यात येते.

Read in English