CoronaVirus News : खूशखबर! 'स्पुटनिक-व्ही'नंतर आता रशियाच्या दुसऱ्या कोरोना लसीलाही मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 01:17 PM2020-10-15T13:17:50+5:302020-10-15T13:49:36+5:30

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

जगातील देशांना पुन्हा आश्चर्यचकित करत रशियाने आणखी एक कोरोनावरील लस तयार केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आल्यानंतर रशियाने ही लस मंजूर केल्याचा दावा केला आहे.

रशियाने १२ ऑगस्टला जगातील पहिली लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली होती. आता दुसरी कोरोनावरील लस एपिवॅककोरोना (EpiVacCorona) ला मंजुरी देण्यात आली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी देशातील दुसरी कोरोना लस तयार होण्याची घोषणा केली. रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी जाहीर केले की, देशात दुसर्‍या कोरोनावरीललस 'EpiVacCorona' मंजूर झाली आहे.

सुरुवातीच्या चाचणीमध्ये चांगले परिणाम दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेप्टाइड-आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे.

दुसर्‍या लसीची घोषणा करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, "आता आम्हाला पहिल्या आणि दुसर्‍या लसीचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. पेप्टाइड आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने तयार केली आहे आणि कोरोना रोखण्यासाठी या लसीचे दोन डोस दिले पाहिजेत."

जवळपास 100 स्वयंसेवकांवर ही लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत भाग घेतलेले स्वयंसेवक 18 ते 60 या वयोगटातील होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ही लस दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी प्राथमिक स्टडी पूर्ण झाली आहे. लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आणि स्टडी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली आहे.

EpiVacCorona लसीशी संबंधित स्टडीचे परिणाम अद्याप प्रसिद्ध केले नाहीत. ही लस विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पर्याप्त अँटीबॉडी तयार करतात आणि यामुळे तयार केलेली प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते. मात्र, चाचण्या सुरू असतानाही ही लस लोकांना दिली जाणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.

रिपोर्टनुसार, रशियाच्या उपपंतप्रधान ततयाना गोलिकोवा यांना ही लस दिली गेली आहे. यापूर्वीही त्यांनी स्वयंसेवक म्हणून सुरुवातीच्या चाचणीत भाग घेतला होता. गोलिकोवा म्हणाले की, कोरोनावरील 'EpiVacCorona' लसीच्या पुढील टप्प्यातील चाचणीसाठी देशभरातील 40,000 लोकांना निवडले जाणार आहे.

दरम्यान, कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातले आहे. आता भारतात हिवाळा सुरू होणार असल्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार की कमी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सुपर कम्प्युटरकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार होण्यासाठी आद्रतेच खूप मोठं स्थान असते. त्यामुळेच हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सूचना दिली होती.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित लोकांच्या माध्यमातून विषाणूचे कण हवेत पसरतात. फुगाकू सुपर कम्प्युटरने याबाबत विश्लेषण केले होते. या अभ्यासात दिसून आले की, फेस शिल्ड, फेस मास्कप्रमाणे प्रभावी ठरत नाही. या अभ्यासानुसार बंद हॉटेल्समध्ये एकाचवेळी जास्त लोक गेल्यास किंवा एसी सुरू असल्यास कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो.

Read in English