खुशखबर! भारतात लवकरच होणार रशियातील 'स्पुटनिक-व्ही' लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 11:01 PM2020-10-17T23:01:38+5:302020-10-17T23:20:07+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

जगातील देशांना आश्चर्यचकित करत रशियाने कोरोनावरील स्पुटनिक व्ही (Sputnik-V) ही लस तयार केली आहे. रशियाने १२ ऑगस्टला लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली.

रशियाने तयार केलेल्या कोरोनावरील स्पुटनिक व्ही लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी लवकरच भारतात होण्याची शक्यता आहे. यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतातील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला (DRL) मान्यता दिली आहे.

हैदराबाद स्थित फार्मास्युटिकल फर्मने १३ ऑक्टोबरला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे दुसऱ्यांदा अर्ज केला होता आणि देशात रशियाची स्पुटनिक व्ही लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यास परवानगी मागितली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासंदर्भात तयार करण्यात आलेल्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) शुक्रवारी बरीच चर्चा केल्यावर संभाव्य लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी प्रथम करण्याची परवानगी देण्याची शिफारस केली. दुसर्‍या टप्प्यातील सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीशी संबंधित डेटा सादर केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात मानवी चाचण्यांना परवानगी दिली जाणार आहे.

डॉ. रेड्डीज आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, 'ही एक बहु-केंद्र आणि नियंत्रित स्टडी असेल. ज्यामध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारक संदर्भात असणार आहे.'

विशेष म्हणजे, लस म्हणून नोंद होण्यापूर्वी स्पुटनिक व्ही लसीची रशियामध्ये कमी लोकांवर चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे डीसीजीआयने डॉ. रेड्डीज यांच्या भारतातील मोठ्या संख्येने लोकांवर चाचणी करण्याच्या सुरुवातीच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, सध्या या लसीची ४० हजार लोकांवर चाचणी सुरू आहे.

दरम्यान, रशियाने आणखी एक कोरोनावरील लस तयार केली आहे. कोरोनावरील दुसरी लस एपिवॅककोरोना (EpiVacCorona) ला सुद्धा रशियाने मंजुरी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आल्यानंतर ही लस मंजूर केल्याचा दावा केला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या बुधवारी देशातील दुसरी कोरोना लस तयार होण्याची घोषणा केली. रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की, देशात दुसर्‍या कोरोनावरील लस 'EpiVacCorona' मंजूर झाली आहे.

सुरुवातीच्या चाचणीमध्ये चांगले परिणाम दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेप्टाइड-आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. जवळपास 100 स्वयंसेवकांवर ही लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत भाग घेतलेले स्वयंसेवक 18 ते 60 या वयोगटातील होते.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, EpiVacCorona लस दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी प्राथमिक स्टडी पूर्ण झाली आहे. लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आणि स्टडी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली आहे.