दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

By manali.bagul | Published: September 22, 2020 11:35 AM2020-09-22T11:35:51+5:302020-09-22T11:53:13+5:30

कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी अनेक देशांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. कारण जगभरात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढच्या वर्षापर्यंत लस नक्कीच तयार होऊ शकते. असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सुरूवातीला उपलब्ध असलेल्या डोजची संख्या कमी असून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो. वेल्लोरच्या वैद्यकिय महाविद्यालयातील प्राध्यापक गगनदीप कांग यांनी ब्लूमबर्गशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

ते जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल एडवायजरीचे सदस्य आहेत. लस लॉन्च झाल्यानंतर 1.3 कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी उपलब्ध असेल.

प्राध्यापक गगनदीप कांग यांनी सांगितले की,'' अनेक लसी या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसींची चाचणी विकसित होण्याची शक्यता ५० टक्के आहे. यावर्षांच्या शेवटापर्यंत आमच्याकडे अनेक लसींचा डेटा आलेला असेल.

त्यामुळे कोणती लस चांगली विकसित झाली आहे किंवा कोणत्या लसीवर काम सुरू आहे. याची योग्य माहिती मिळवता येऊ शकते. लसीचे चांगले परिणाम दिसून आल्यास पुढच्या वर्षाच्या म्हणजेच २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते. नंतरच्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

प्राध्यापक कांग भारत सरकारच्या त्या स्वदेशी लसीचे नेतृत्व करत आहेत. ज्यांच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत.

भारतात सध्या वेगवेगळ्या लसी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यातून जात आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकनं तयार केलेली लस कोवॅक्सिनची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे.

झायडस कॅडिला या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख, ६२ हजार ६६३ एवढी झाली आहे. तर या २४ तासांत एक हजार ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८८ हजार ९३५ एवढा झाला आहे.

मात्र या सर्वामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.

Read in English