Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:07 PM2022-01-17T15:07:05+5:302022-01-17T15:20:39+5:30

नुकतेच, वॉशिंग्टनचे वैज्ञानिक आणि व्हायरलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले, ही महामारी कायम राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. भारतासह जगभरातील अनेक देश या संसर्गाशी लढा देत आहेत. कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार लोकांना झपाट्याने संक्रमित करत आहे. दरम्यान, एक दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे.

नुकतेच, वॉशिंग्टनचे वैज्ञानिक आणि व्हायरलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले, ही महामारी कायम राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे. एवढेच नाही, तर बुद्धिबळाच्या या खेळात कुणीही विजयी नाही. हा सामना एखाद्या अनिर्णित सामन्याप्रमाणे आहे. जिथे व्हायरस लपून बसेल आणि आपण खऱ्या अर्थाने जिंकू, तसेच आपल्याला लवकरच फेसमास्कपासून मुक्तता मिळेल. आशा आहे की, आपण पुन्हा पुढे जाऊ.

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झालेल्या देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनापर्यंत 156 कोटी डोस टोचून भारताने एक नवा विक्रम केला आहे. यावर बोलताना डॉ. कुतुब म्हणाले, लस हेच कोरोनाशी लढण्यातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

डॉ. कुतुब म्हणाले, आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटीबॉडी सारखी शस्त्रे आहेत. आपण यांचा वापर व्हायरस विरोधातही केला आहे.

व्हायरलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद यांनी बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण देत सांगितले की, कोरोना व्हायरस स्वतःच्या चाली चालत आहे आणि आपणही आपल्या चालींनी त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. फेस मास्क वापरणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या आपल्या अगदी छोट्या चाली आहेत. याच चालींनी आपल्याला कोरोनावर मात करायची आहे.

महमूद पुढे म्हणाले, यापुढेही नवा व्हेरिअंट आला, तरी आपल्याला त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर संपूर्ण लोकांचे लसीकरण झाले, तर आपण सर्वजण येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतो.

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे कौतुक करताना डॉ. कुतुब म्हणाले, हे एक चांगल्या प्रकारचे डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. यासाठी मी भारत सरकार आणि भारतीय कंपनीचे अभिनंदन करू इच्छितो. ही एक उत्तम लस आहे आणि क्लिनिकल डेटामध्ये ती 2 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही चांगला परिणाम दाखवते, असे आमच्या निदर्शनास आले आहे.